संतोष मानेवर गुन्हा सिद्ध, नऊ जणांची केली हत्या

पुण्यात बेदरकारपणे बस चालवून अनेकांचे जीव घेणारा संतोष माने याला कोर्टानं दोषी ठरवलंय. खून आणि खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान या आरोपांखाली संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलंय. त्याला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 3, 2013, 08:12 PM IST

www.24taas.com, पुणे
पुण्यात बेदरकारपणे बस चालवून अनेकांचे जीव घेणारा संतोष माने याला कोर्टानं दोषी ठरवलंय. खून आणि खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान या आरोपांखाली संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलंय. त्याला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
पुणे अतिरिक्त सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय. संतोष मानेनं 25 जानेवारी 2011 रोजी पुण्यात बेदरकारपणे बस चालवून अनेकजणांना चिरडलं होतं. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर 27 जण जखमी झाले होते. तर जवळपास पन्नास गाड्यांचा चुराडा झाला होता.
नेमकं काय घडलं होतं
मुळचा सोलापूरचा असलेला संतोष माने एस टी च्या स्वारगेट डेपोला ड्रायव्हर म्हणून कामाला होता. २५ जानेवारीच्या सकाळी माने लवकरची ड्युटी मागण्यासाठी डेपोमध्ये गेला. त्याला सकाळी १ ० ऐवजी सकाळी ८ ची ड्युटी हवी होती. मात्र ड्रायव्हरच्या उपलब्धतेमुळे त्याला ती मिळू शकली नाही. त्यानंतर मानेनं परत फिरणं अपेक्षित होतं . मात्र तसं झालं नाही.
सातारा डेपोची एक बस (बस क्रमांक - MH - 14 BT 1532) नुकतीच स्वारगेट स्थानकात आलेली होती. बसचा ड्रायव्हर एन्ट्री करण्यासाठी कंट्रोल रूम मध्ये गेलेला होता. तेवढ्यात संतोष मानेनं त्या बसचा ताबा घेतला. त्यानं बस सुरु केली आणि मनाला वाटेल त्या दिशेनं धावत सुटला. स्वारगेट एस टी स्टेन्ड मध्ये एक वळसा घालेस्तोवर ३ -४ जण मानेच्या बसखाली आले होते. इतरांना काही कळायच्या आत मानेची बस हडपसर रस्त्याला लागली. त्यानंतर नो एन्ट्री मधून पुलगेट, क्याम्प, मार्केट यार्ड रोड, मित्रमंडळ चौक, सारसबाग करत बस सिंहगड रस्त्याला लागली होती. तोपर्यंत बसची बातमी शहरभर पसरली होती.
प्रत्येक माणूस आपापल्या परीने सतर्क बनला होता. त्याचवेळी शेकडो लोक आणि अर्थातच पोलिस या पिसाळलेल्या बसचा पाठलाग करत होते. पोलिसांनी बसच्या दिशेने गोळीबारही केला …
एक पोलिस बसवर चढला…. आपल्याच मस्तीत असलेला मने काही केल्या बस थांबवायला तयार नव्हता… अखेर पर्वती पायथ्याजवळ , नीलायम पुलाखाली मानेची बस डिव्हायडरला धडकली. त्याठिकाणी देखील एका कारचा चुराडा करूनच बस आपोआप थांबली… काही तरुणांनी बसवर चढून मानेला ताब्यात घेतलं