महायुतीच्या सत्तेत रिपाइंचा उपमुख्यमंत्री- आठवले

2014च्या निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रीपद आरपीआयला देण्यात यावं, अशी मागणी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केलीये.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 2, 2013, 10:50 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
2014च्या निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रीपद आरपीआयला देण्यात यावं, अशी मागणी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केलीये.
सोलापूरात आयोजित संघर्ष मेळाव्यात त्यांनी हे मत मांडलंय. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनीच आपल्याला अशी ऑफर दिल्याचा दावाही आठवले यांनी केलाय.
पुढल्या वर्षी राज्यात युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री भाजप किंवा शिवसेना यापैकी एका पक्षाचा होईल, आणि उपमुख्यमंत्री आपला असेल, असं आठवलेंचं म्हणणं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना बाजूला ठेवूनदेखील राज्यात सत्तांतर घडविण्याची ताकद शिवसेना-भाजप अन् रिपाइंच्या महायुतीत आहे, असे प्रतिपादन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
आठवले काल पंढरपूर दौर्याचवर होते. राज ठाकरे यांच्या मनसेने महायुतीत यावे या त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करताना ते म्हणाले, राज यांना महायुतीत घ्यायचे की नाही याचा सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. येत्या आठवडाभरात शिवसेना-भाजप व रिपाइंची नेतेमंडळी या विषयावर बसून चर्चा करणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होईल.
पण मनसेशिवायदेखील राज्यात सत्तांतर करण्याची शिवसेना-भाजप आणि रिपाइं महायुतीत ताकद आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर ज्याच्या जागा जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद रिपाइंला, असा आपला आग्रह असणार आहे. दोन्ही पक्षांनी रिपाइंला उपमुख्यमंत्रीपद देण्याचे मान्य केले तर राज्यातील दलित वर्ग महायुतीच्या मागे अधिक मजबुतीने उभा राहील, असा विश्वातस आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.