खासदार राजू शेट्टी यांनी `त्या` मुद्याला दिली तिलांजली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. पण खासदार राजू शेट्टी यांनी ज्या मुद्यावर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी फारकत घेतली, त्याच मुद्याला आता शेट्टींनी तिलांजली दिल्याचं स्पष्ट होतंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 8, 2014, 08:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. पण खासदार राजू शेट्टी यांनी ज्या मुद्यावर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी फारकत घेतली, त्याच मुद्याला आता शेट्टींनी तिलांजली दिल्याचं स्पष्ट होतंय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी महायुतीत दाखल झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला चांगला फायदा होणार आहे. हातकणंगले आणि माढा हे मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार आहेत. पण त्याऐवजी कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जागा आपल्या पदरात पडाव्यात यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे. पण तसं होण्याची शक्यता फारशी नाही. कारण कोल्हापूरच्या जागेवरील हक्क शिवसेना सहज सोडणार नाही. आणि सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे ताकदीचा उमेदवार नाही.
शेट्टी यांनी राजकीय स्वार्थापोटी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. पण याच शेट्टी यांनी २००४ च्या निवडणुकीत शरद जोशी यांनी एन.डी.एला पाठिंबा देण्याच्या निर्णयला तीव्र विरोध केला होता. त्याच मुद्यावरून जोशी यांच्याशी फारकत घेतली होती.
राजू शेट्टी यांनी लिहिलेल्या `शिवार ते संसद` या आत्मकथनातही त्याचा उल्लेख आहे. शरद जोशी यांनी शिवसेना-भाजपला जातीयवादी गिधाडं अशी उपमा दिली होती. त्यानंतर मात्र शरद जोशी यांनी २००४ च्या निवडणुकीत एन.डी.एला पाठिंबा दिला. त्यामुळं गिधाडं राजहंस कधी झाली, असा सवाल लोक आम्हाला करु लागले आहेत, असेही राजू शेट्टी यांनी आपल्या आत्मकथनात नमूद केलंय. त्यामुळे आता महायुतीत गेलेल्या राजू शेट्टींच्या त्या भूमिकेचं काय झालं, असा सवाल उपस्थित केला जातोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ