पुणे मनपातल्या नेत्यांच्या मुलांचं 'वयं मोठ्ठं खोटम्'!

वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला कायद्यानुसार सज्ञान समजण्यात येतं. किमान भारतात तरी हा क़ायदा आहे. पण पुणे महापालिकेच्या महापौर, सभागृह नेते यांची मुलं मात्र वयाच्या 16-17 व्या वर्षीच सज्ञान बनली आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 22, 2013, 01:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला कायद्यानुसार सज्ञान समजण्यात येतं. किमान भारतात तरी हा क़ायदा आहे. पण पुणे महापालिकेच्या महापौर, सभागृह नेते यांची मुलं मात्र वयाच्या 16-17 व्या वर्षीच सज्ञान बनली आहेत. ती एवढी सज्ञान बनली आहेत की, त्यांनी पुणे महापालिकेच्या वतीने दक्षिण कोरियाचा अभ्यासदौरा केला आणि त्याही पुढे जाउन कोरिया बरोबर सामंजस्य करार देखील केला. पुणे महापालिकेच्या कोरीया दौ-याची सुरस कथा...
पुणे महापालिकेच्या सर्वपक्षीय पदाधिका-यांनी दक्षिण कोरियाच्या केलेल्या अभ्यासदौ-याचे फोटो पुणे महापालिकेचे सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या फ़ेसबुक वॉलवॉर झळकत आहेत. महापौर वैशाली बनकर, सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यासह मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक या अभ्यासदौ-यात होते. या राजकीय पदाधिका-यां बरोबरच, महापौरांचे पती सुनील आणि मुलगा ऋषिद बनकर, सभागृह नेते सुभाष जगताप यांचा मुलगा श्रीनिवास आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चंदेरे यांच्या पत्नी सरला चंदेरे यांनी कोरीयाची सैर केली. अभ्यसदौ-यात सहभागी होण्यासाठी त्यांनी एनजीओची चोरवाट वापरली. एनजीओचे प्रतिनिधी म्हणून हे चौघे या दौ-यात सहभागी झाले. त्यामुळे हा अभ्यासदौरा होता, की राष्ट्रवादीची फॅमिली टूर असा प्रश्न विचारला जातोय.

अभ्यसदौ-या बरोबरच या शिष्टमंडळाने कोरियातील सूसॉंग शहराबरोबर सामंजस्य करार देखील केला. मात्र, एनजीओ प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेल्यांपैकी, महापौर वैशाली बनकर यांचा मुलगा ऋषिद आणि सुभाष जगताप यांचा मुलगा श्रीनिवास हे दोघेही अल्पवयीन आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलं महापालिकेच्या वतीने अभ्यासदौरा कसा काय करू शकतात आणि त्यावर सामंजस्य करार कसा काय करू शकतात असा प्रश्न विचारला जातोय...पुण्यात किमान 100 एनजीओ तरी अशा आहेत की, ज्या शहरासाठी काम करताहेत.. मात्र यातील एकाही एनजीओचा प्रतिनिधी दौ-यात नव्हता..हे विशेष...
अभ्यासदौ-यासाठी एनजीओनी संपर्क साधला नाही असं उफराटं उत्तर त्यावर नेत्यांनी दिलंय. एनजीओच्या नावाखाली नातेवाईकांना विदेशवारी करून आणणे, अज्ञान मुलांना महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय अभ्यासदौ-यात सहभागी करणे आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरील सामंजस्य करारात या अज्ञान मुलांचा सहभाग असणे या अजब प्रकरणाबाबत पुण्यातील ख-या खु-या एनजीओचे प्रतिनिधी आता मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.