www.24taas.com, अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी.... तुमच्या घराच्या परिसरात जर डास असतील, तर थेट तुमच्यावर खटला दाखल होणार आहे. आणि आणि हा नुसताच इशारा नाही तर महापालिकेनं तशा प्रकारे दोन पुणेकरांवर कारवाईसुद्धा केली आहे. त्यामुळे तुमच्या घरांत किंवा परिसरात डास असतील तर त्यांना ताबडतोब मारुन टाका.
पुणेकरांनो, डासांपासून दूर रहा...डासांबरोबर रहाल तर आरोपी व्हाल...ताबडतोब करा मच्छरांचा खात्मा
डासांमुळे होणा-या डेंग्यू, चिकुन गुनिया, हिवतापांसारख्या आजारांचं गांभीर्य ओळखून महापालिकेची आरोग्य यंत्रणा डास निर्मुलनाच्या कामाला लागलीय. मात्र ही जबाबदारी फक्त आरोग्य विभागाची नसून त्यात नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे... आणि जे नागरिक ही जबाबदारी घ्यायला टाळाटाळ करतील, त्यांच्यावर थेट खटला दाखल केला जाणार आहे. पुण्यातल्या चांदणी चौकातल्या एक दुकानदारावर आणि नानापेठेतल्या एका बंगल्याच्या मालकावर अशाप्रकारे खटला दाखल करण्यात आलाय. त्यांच्या घराच्या परिसरातली डासांची उत्पत्तीस्थळं अनेकवेळा नोटीस देऊनही नष्ट केली नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय.
महापालिकेच्या आरोग्य विभागानं डासांच्या उत्पत्ती स्थळांचा सर्वे केलाय. त्यानुसार शहरात ३० हजार ठिकाणं डासांची उत्पात्तीस्थळं आढळून आली आहेत. त्यापैकी ७०० नागरिकांना ही उत्पत्तीस्थळं नष्ट करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
पुण्यात यावर्षी आतापर्यंत डेंग्यूचे ६८ तर हिवतापाचे २४ रुग्ण आढळलेत. पावसाळ्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तुमच्या दारातले मच्छर तुम्हाला आजारी तर करतीलच आणि कोर्टासमोर आरोपीसुद्धा बनवू शकतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.