www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सिंधुदुर्गः भरतीचा फटका
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबागमधल्या माडबागायतीसह सुमारे १० घरांना आजच्या हायटाईडचा फटका बसलाय. समुद्राचं पाणी थेट घरांमध्ये घुसलंय. इथला बंधाराही पाण्यामुळे वाहून गेलाय.
दुपारच्या वेळेस समुद्राच्या ४ ते ५ फुट उंचीच्या लाटा उसळत होत्या त्यामुळे मालवण बाजारपेठतल्या दुकानांवरही जोरदार लाटंचा तडाखा बसत होता. देवबागचा धोका आता आणखी वाढलाय. कारण इथला संरक्षक बंधारा वाहून गेलाय.
गेले 15 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी घसत होतं. आता समुद्रानंही अतिक्रमण केल्यानं सिंधुदुर्ग जिल्हा दोन्ही बाजूनी निसर्गाशी सामना करतोय. जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झालीय.
रत्नागिरीः समुद्राचे पाणी गावांत
रत्नागिरी जिल्ह्यातही समुद्रकिना-यांवरच्या अनेक गांवांत समुद्राचं पाणी शिरल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. दुपारी दीडच्या सुमारास उसळलेल्या उंच लाटांमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे काही गावांमध्ये रस्त्यांवर पाणी आलं होतं...
लोणावळाः अनेक रस्ते पाण्याखाली
लेक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात गेल्य़ा काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये १५५ मिमी.पावसाची नोंद झालीय. लोणावळ्यातले अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत.
राष्ट्रीय महामार्गालाही या पावसाचा फटका बसलाय. मुसळधार पावसामुळे भुशी डॅम, घुबड तलाव, खंडाळा तलाव १०० टक्के भरलेत. तर तुंगार्ली धरण, वळवण धरण, लोणावळा धरण यांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झालीय. यावर्षी आतापर्यंत लोणावऴयात ३१५० मिमी.पावसाची नोंद झालीय गेल्या वर्षी याच वेळी हा पाऊस फक्त १३५० मिमी इतका होता. म्हणजेच गेल्या वेळपेक्षा जवळपास तिप्पट पाऊस गेल्या दोन महिन्यांतच झालाय.
जळगावः पावसाने सरासरी ओलंडली
जळगाव जिल्ह्यात कधी संततधार तर कधी दमदार बरसलेल्या पावसानं गेल्या वर्षीची सरासरी ओलांडलीय. जिल्ह्याचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान 664 मिमी असून आतापर्यंत 356.43 मिमि पावसाची नोंद झालीय.
तापी नदीच्या उगम क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यातून हजारो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलाय. या पावसामुळे जमिनीची तहान भागली असली तरी अनेक प्रकल्पांमध्ये अजुनही पुरेसा पाणीसाठी नसल्यानं भविष्यातली चिंता कायम आहे.
जिल्ह्यातल्या मंगळूर सुकी या प्रकल्पात आता 100 टक्के पाणीसाठा आहे. मात्र वाघूर, गिरणा, या मोठ्या प्रकल्पासह मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा तसंच बहुरा हे प्रकल्प कोरडेच आहेत. त्यामुळे हे प्रकल्प भरण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा जळगावकरांना आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.