अहमदनगर तालुक्यातील गर्भगिरी परिसरात उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी इनरकॉन इंडिया कंपनीने शेतक-यांच्या इच्छा नसतानाही खरेदी केल्या. तसंच जे शेतकरी या कंपनीला विरोध करतात त्या शेतक-यांना कंपनीचे गुंड मारहाण करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
कर्जबाजारीपणा आणि नापिकी यामुळं राज्यातला शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच दुष्काळामुळं शेतक-यांवर आस्मानी संकट कोसळलंय. हे कमी होतं की काय म्हणून आता पवनऊर्जा कंपनीकडून होणा-या फसवणूकीमुळं बळीराजा हैराण झाला आहे. सुझलॉन कंपनीकडून झालेल्या फसवणुकीमुळं सांगलीतल्या शेतक-यानं पवनचक्की टॉवरवर गळफास लावून आत्महत्या केली होती. आता असाच काहीसा प्रकार अहमदनगरमधल्या गर्भगिरी परिसरात घडला आहे. इनरकॉन कंपनीने इथल्या शेतक-यांच्या शेतजमिनी खरेदी केल्या. मात्र कंपनी कर्मचारी आणि एजंटकडून जमिनी बळजबरीने घेत फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप आता शेतक-यांक़डून होत आहे.
इनरकॉन कंपनी शेतक-यांवर दबाव टाकण्यासाठी गुंडाद्वारे धमकावत असल्याचा आरोपही होतोय... शिवाय पोलीसही कंपनीच्या दबावाखाली काम करत असल्याचं शेतक-यांनी म्हटलंय. या संदर्भात कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कंपनीने काहीही बोलण्यास नकार दिलाय...तर पोलिसांनी मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगितलंय. अशा फसवणुकीमुळं दाद मागावी कुणाकडं असा प्रश्न चोहीबाजूंनी संकटांनी घेरलेल्या बळीराजापुढं उभा ठाकलाय...