www.24taas.com, कोल्हापूर
पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:च्या मुलांना पैशासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार राजर्षी शाहूंची नगरी असणा-या कोल्हापुरात उघडकीस आलाय. इथं राहणा-या आदिवासींनी अनेक मुलांना धनगरांना विकलंय. प्रशासनाला यासंदर्भात माहिती कळल्यानंतर त्यांनी त्यातल्या 18 मुलांची सुटका केली आहे.
कोल्हापूरच्या पश्चिमेस असणा-या राधानगरीमध्ये छत्रपती शाहु महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी राधानगरी धऱणाची उभारणी केली. पण ज्यांच्या पुर्वजानी हे धरण उभारणीला हातभार लावला तो आदिवासी कातकरी समाज आजही वा-यावर आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी इथल्या आदिवासींनी चक्क आपली गोंडस मुलं धनगरांना विकुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आणि त्याची कबुलीही त्या दुर्देवी आईवडिलांनीच दिली आहे.
जंगलावर उदरनिर्वाह करणारा आदिवासी समाजाची ही वस्ती राधानगरीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे,पण इथं कुठल्याच प्राथमिक सुविधा पोहोचललेल्या नाहीत. त्यामुळे हा आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळंच त्यांच्यावर मुलं विकण्याची वेळ आलीय. इथल्या आदिवासींसाठी घरकुल योजनाही मंजूर करण्यात आली होती. पण वनविभागाच्या विरोधामुळं तेही रखडलंय. त्यामुळं फाटक्या झोपडीतचं विकासाचं स्वप्न पहात हे आदिवासी जगत आहेत.
पैशांसाठी मुलांची विक्री होत असल्याची माहिती कळताच प्रशासन खडबडून जागं झालं. प्रशासनानं मेंढपाळांना विकलेल्या 18 मुलांची सुटका केली आहे. निवडणुका आल्या की मतदानासाठी या आदिवासी कातकरी समाजाची राजकारण्यांना आठवण होते. मात्र निवडणुकांनंतर या भागाकडे कुणीही फिरकत नाही. त्यामुळं आजही हा समाज विकासाच्या आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे. आदिवासी कातकरी समाजाचे प्रश्न जर सुटले नाहीत तर मुलं विक्रीसारखे प्रकार थांबणार नाहीत हे नक्की