www.24taas.com, पंढरपूर
पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरावर बडवे आणि उत्पातांचा कब्जा आहे. या मंदिरातील अधिकचं उत्पन्न बडव्याकडे जाते, त्यामुळे विकासावर परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केला आहे. सांगलीमध्ये डांगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंदिरातील दान पेटीत सुद्धा चोऱ्या होत असल्याचा प्रकार आत्ता समोर आला आहे. तसंच बडव्याचे अधिकार ठरवण्याबाबत एक केस सर्वोच्च न्यायलयात प्रलंबित आहे, मात्र पंचवीस वर्ष झाले तरी या केसच्या तारखा सुद्धा पडलेल्या नसल्याचंही अण्णा डांगे म्हणाले.
मंदिराचे उत्पन्न वाढवून विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील तसंच, भाविकांना सुलभ दर्शन देण्या बाबत सुद्धा पयत्न सुरु आहेत असेही डांगे यांनी यावेळी सांगितले. तर पुजारी वा.ना.उत्पातांशी काही वेळापूर्वी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली की समितीकडे २५ कोटी रुपयांचा निधी असूनही समितीने अद्याप कुठलाही विकास केलेला नाही. डांगे आत्ताच अध्यक्ष झाल्याने त्यांना अजून पूर्ण जाणीव नसावी.