कैलास पुरी, www.24taas.com, पिंपरी चिंचवड
सिनेमात नकली डॉक्टर बनून रुग्णांचा इलाज कारणाऱ्या संजय दत्त उर्फ मुन्नाभाईला आपण चांगलंच ओळखतो. पण असाच एखादा मुन्नाभाई जर वास्तविक जीवनात बनावट कागदपत्राच्या आधारे डॉक्टर बनून इलाज करत असेल तर…
मुळचा सोलापूरचा असलेला विशाल दत्तात्रय बनसोडे तळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर म्हणून रुजू झाला. सुरवातीला कुणालाच काही संशय आला नाही. बनावट कागदपत्राच्या आधारे डॉक्टर म्हणून रुजू झालेल्या या मुन्नाभाईने अनेकांवर उपचारही केले. सुदैवान कान नाक घसा विभागात तो काम करत असल्याने आणि कोणताही मोठा इलाज तो करत नसल्यान अनेक रुग्णांचे प्राण वाचले. त्याची बनावटगिरी अशीच सुरू होती. मात्र आता त्याचं बिंग फुटलं. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी तर मिळवली. मात्र, तळेगावच्या एका बँकेतून कर्जही काढलं. मात्र वेळेत कर्जाचे हप्ते न फेडल्यामुळे त्याने दिलेल्या मूळ पत्त्यावर बँकेची नोटीस गेली आणि इथेच तो फसला. कर्जासाठी या भामट्यान जितेंद्र साहेबराव डोलारे यांची कागदपत्र वापरली होती, त्यामुळे कर्ज घेतलंच नाही तर नोटीस कशी, म्हणून ते चौकशी साठी बँकेत आले आणि हा सगळा प्रकार लक्षात आला. डोलारे यांनी तातडीन तळेगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आणि या मुन्नाभाईला पोलिसांनी अटक केली.
आरोपी विशाल बनसोडे हा जितेंद्र डोलारे यांच्या नावाने तळेगावच्या एमआयटीच्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात ऑगस्ट २0११ पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉक्टर म्हणून काम करत होता. तळेगाव मधल्या हरण्येश्वेर रुग्णालयातही त्याने नोकरी केली. सुदैवान या भामट्या डॉक्टरला पकडण्यात पोलिसांना वेळीच यश आलं आणि या भामट्याची बनवेगिरी थांबलीय. अन्यथा अनेक रुग्णांच्या जीवाला धोका पोचला असता. मात्र रुग्णालय प्रशासनालाही त्याची बनावट कागदपत्र कशी लक्षात आली नाहीत, असाही सवाल आता केला जात आहे.