अधिकाऱ्यांना चोपणारे आमदार करणार सूर्यवंशींच्या मारहाणीची चौकशी!

मंत्रालयातील पीएसआय मारहाणप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आर एम वाणी यांचाही समावेश आहे. मात्र याच महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातही अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची अनेक प्रकरणं आहेत. त्यामुळे असे आमदार काय चौकशी करणार असा सवाल आता केला जात आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 31, 2013, 06:23 PM IST

www.24taas.com, नाशिक
मंत्रालयातील पीएसआय मारहाणप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आर एम वाणी यांचाही समावेश आहे. मात्र याच महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातही अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची अनेक प्रकरणं आहेत. त्यामुळे असे आमदार काय चौकशी करणार असा सवाल आता केला जात आहे.
औरंगाबादच्या वैजापूरचे शिवसेना आमदार आर. एम. वाणी...यांची आणखी एक ओळख सांगायचं तर अधिका-यांना मारहाण करणारे आमदार अशीही सांगता येईल. मात्र याच आमदार महोदयांचा आता मंत्रालयातील पीएसआय मारहाण चौकशी समितीत समावेश करण्यात आलाय.
अवैधरित्या पाणी चोरी पकडून बंद केल्याने वैजापूर पाटबंधारे कार्यालयातील तीन अभियंत्यांनी घरी हजर राहावे असे आदेश सोडणारे हे वैजापूरचे आमदार आर एम वाणी. आपल्याला वाटत असेल लोकांसाठी किती हे कष्ट...मात्र या महोदय आमदारांनी चोरी का रोखली हे विचारताच अभियंत्यांनी बेकायदेशीर असल्याने कारवाई केल्याचं उत्तर दिलं. मग काय, आमदार साहेबांचा पारा चढला त्यांनी तीनही अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली. १४ ऑगस्ट १२ ची ही घटना.

अपमानास्पदरीत्या मारहाण केल्याबद्दल यातील एका अधिकऱ्याने पोलीस स्टेशन गाठले. दबाव झुगारत या अधिकऱ्याने गुन्हा दाखल केला खरा मात्र आजपर्यंत कुठलीही कारवाई या आमदाराच्या दहशतीखाली असलेल्या पोलिसांनी केलेली नाही. मुख्य म्हणजे उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळूनही पोलिसांच्या आशीर्वादाने आठ महिन्यांपासून ते मोकाट आहेत. या घटनेवर झी २४ तासने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार साहेबांनी गोलगोलच उत्तर देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.