बलात्कार पीडित महिलांसाठी वैद्यकीय चाचणीची सोय

पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची सोय उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे. त्याची पिंपरी चिंचवड पोलिसांनीही दखल घेतलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 6, 2013, 07:57 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची सोय उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे. त्याची पिंपरी चिंचवड पोलिसांनीही दखल घेतलीय.
एखाद्या महिलेवर किंवा तरुणीवर बलात्कार झाला, तर तिची तातडीनं वैद्यकीय चाचणी करून तिला मानसिक आधार देण्याची गरज असते. पिंपरी-चिंचवडमध्ये परिस्थिती काहीशी उलटी आहे. बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर पीडित तरुणीच्या तपासणी सोय उपलब्ध नाही. त्यासाठी या पीडित महिलेला तपासणीसाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नेलं जात असे. यामुळं पीडित मुलीला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत होतं. शिवाय या प्रक्रियेत पोलिसांचाही अधिक वेळ जात होता. त्यामुळं अशाप्रकारे वैद्यकीय तपासणीची सोय पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सुरु व्हावी अशी मागणी होत आहे.
पोलिसांना उशीरा का होईना जाग आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेला वैद्यकीय चाचणीची सोय उपलब्ध करुन देण्याची विनंती पोलिसांनी केली आहे. बलात्कार पीडित महिलेला घटनेनंतर मानसिक आधाराची गरज असते. मात्र वैद्यकीय तपासणी वेळखाऊ असल्यानं पीडित महिलेला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळं लवकरात लवकर वैद्यकीय तपासणीची सोय पिंपरी चिंचवडमध्ये व्हावी हीच अपेक्षा.