‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 4, 2013, 03:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सांगली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.
सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. सांगलीत काँग्रेसवर टीका करणारे हेच जयंत पाटील सोनिया गांधी मुंबईत आल्या, की मला काँग्रेसमध्ये घ्या म्हणून त्यांच्याकडे हट्ट करतात. एकीकडे तोंडदेखलं म्हणून काँग्रेसवर टीका करायची आणि दुसरीकडे काँग्रेसमध्ये येण्यासाठी सोनिया गांधींकडे विनंती करायची, हा जयंत पाटील यांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप माणिकरावांनी केलाय.

दरम्यान, माणिकराव ठाकरेंचा आरोप बिनबुडाचा आहे. ज्यावेळी सोनिया गांधी मुंबईत आल्या त्यावेळी मी मुंबईचा पालकमंत्री होतो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात होतो. हाच केवळ प्रसंग आहे. आम्ही राष्ट्रवादीचे आणि शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. त्यामुळे राष्ट्रवादीशिवाय दुसरा कोणत्याही पक्षाचा विचार मनात नाही. काँग्रस केवळ उगाचच भांडवल करीत आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील यांनी आरोप खोडताना म्हटलंय.
आपण निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करण्याच्या विचारात आहोत, असे पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपन्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी ठाकरे काय म्हणालेत हे मी ऐकलेले नाही, असं सांगत आताच बोलणे योग्य नाही. यावेळी पाटील यांचे त्यांनी समर्थन केलंय. त्यांचा पराभव होत आहे, याची त्यांना जाणीव झालेय. म्हणून त्यांनी हे नैराश्यातून विधान केल्याचे जाधव म्हणालेत.
*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.