www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
टोलवसुलीच्या विरोधात आज शिवसेनेनं कोल्हापूर बंदची हाक दिलीय. कोल्हापूरकरांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक झाला. टोलविरोधी आंदोलनला रविवारी हिंसक वळण लागलं. कोल्हापुरातील फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.
मंत्र्यांच्या आश्वासनाला काही तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा कोल्हापुरात टोलवरुन रणकंदन माजलं... टोलला विरोध करत कोल्हापूरकरांनी आयआरबी कंपनीच्या फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची तोडफोड केली.. यावेळी टोलनाक्यावरील केबिन पेटवून देण्यात आली.. आगीत केबिनमधल्या सगळ्या वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या.. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या आश्वासनानंतर शनिवारी सहा दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण आंदोलन मागं घेण्यात आलं.. मात्र या आश्वासनानंतरही टोलवसूली सुरु राहिल्यानं कोल्हापूरकरांनी संताप व्यक्त केला...
शिवसेनेच्या आंदोलनानंतर कोल्हापूरचे महापौर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवकही टोलनाक्यांवर पोहचले.. हे आंदोलन चिघळण्यास आयआरबी कंपनी जबाबदार असल्याचा आरोप महापौर सुनीता राऊत यांनी केला.. यावेळी महापौरांनी कंपनीला कोल्हापूरी भाषेत सज्जड दमही दिला...
दुसरीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांना सबुरी आणि शांतता राखण्याचं आवाहन केलंय.. असं असलं तरी शिवसेनेनं टोलविरोधात सोमवारी कोल्हापूर बंदची हाक दिलीय.. त्यामुळं टोलचा प्रश्न आणखी पेटण्याची चिन्हं आहेत...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.