www.24taas.com, झी मीडिया, पुणे
भोसरीतील `गोल्डमॅन` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ता फुगे यांच्या पत्नी आणि (जातीचं बनावट प्रमाणपत्र सादर केल्यानं नगरसेवक पद रद्द झालेल्या) माजी नगरसेवक सीमा फुगे यांच्याकडून ६१ लाखांची खंडणी उकळणाऱ्या खंडणीखोराला पोलिसांनी अटक केलीय. हा खंडणीखोर दुसरा-तिसरा कुणीही नसून शिवसेनेचा विभागपमुख अशोक कोतवाल आहे. कोतवालसहीत आणखी दोन जणांना अटक करण्यात आलीय.
सोन्याचा शर्ट शिवलेल्या फुगे यांची पत्नी सीमा आणि अशोक कोतवाल यांच्या पत्नी सारिका या महापालिका निवडणुकींत एकमेकांविरोधात लढल्या होत्या. त्यात फुगे यांची पत्नी (राष्ट्रवादी) निवडून आल्या. या निवडणुकीसाठी त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राचा वापर केल्याचा दावा कोतवाल बंधूंनी केला होता.
दरम्यान, मनोज कोतवाल आणि अशोक कोतवाल यांनी दत्ता फुगे यांना `सीमा फुगे यांनी दिलेले बनावट जात प्रमाणपत्र महापालिका व निवडणूक आयोग यांच्याकडे देऊन तुमची तक्रार करू.. त्यामुळे तुमच्या पत्नीचं नगरसेवक पद रद्द होईल` अशी धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यावेळी घुगे यांनी वेळोवेळी त्यांना ६१ लाख ५० हजार रुपये रोख दिले. त्यानंतरही कोतवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे फुगेंचं नगरसेवक पद रद्द झालं.
त्यानंतर फुगेंनी आपण दिलेली रक्कम कोतवाल यांच्याकडे परत मागितली. परंतू यावर कोतवाल यांनी उलट फुगेंनाच मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर फुगेंनी पुणे पोलिसांकडे तक्रार केली आणि या प्रकरणाचं यांचं बिंग फुटलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.