‘बोगस महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक’

राज्यातल्या सहा आयुर्वेदिक महाविद्यालयांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातल्या बीएमएसच्या अकराशे विद्यार्थ्यांचं दीड वर्ष आणि लाखो रुपये वाया गेले आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 28, 2012, 10:57 PM IST

www.24taas.com, नाशिक
राज्यातल्या सहा आयुर्वेदिक महाविद्यालयांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातल्या बीएमएसच्या अकराशे विद्यार्थ्यांचं दीड वर्ष आणि लाखो रुपये वाया गेले आहेत. अशीच बोगस बारा आयुर्वेदिक महाविद्यालयं आजही राज्यात मुलांची फसवणूक करतायत.
बीएएमएस अभ्यासक्रमात दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याच्या तक्रारीवरून २४ महाविद्यालयांना गेल्या वर्षी दिलेली मान्यता तात्पुरती रद्द केली होती. त्यानंतर निकषानुसार सुविधांची पूर्तता झाल्यानंतर अठरा महाविद्यालयं सुरू झाली. तर सहा महाविद्यालयांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली. त्यामुळे या महाविद्यालयात परीक्षा घ्यायला आरोग्य विद्यापीठानं नकार दिलाय. विशेष म्हणजे अशा अनेक दर्जाहीन बोगस संस्था राज्यात आजही मुलांची फसवणूक करत असल्याचं खुद्द आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू अरुण जामकर यांनी स्पष्ट केलंय.
ही बहुतेक महाविद्यालयं राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. नगर जिल्ह्यातली चार, जळगावातलं एक तर धुळ्यातलं एक अशा सहा महाविद्यालयांचं भवितव्य त्यामुळे टांगणीला लागलंय. तर दुसरीकडे व्यवस्थापनानं फी परत करायला नकार दिलाय. सीबीएसई शाळा ,वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयं अशा अनेक महाविद्यालयांमध्ये याच पद्धतीनं विद्यार्थ्यांची फसवणूक होतेय. असं असताना सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतंय.