महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती बदलणार

यावर्षी महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यात दुष्काळी स्थिती आहे. मात्र सप्टेंबरमध्ये दुष्काळाची स्थिती काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून जोरदार बरसेल असा विश्वास हवामान खात्यानं व्यक्त केलाय. पावसावर विपरीत परिणाम करणा-या एल निनोची निर्मिती होणार नाही असंही हवामान खात्याचा अंदाज आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 28, 2012, 09:31 PM IST

www.24taas.com, मुंबई
यावर्षी महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यात दुष्काळी स्थिती आहे. मात्र सप्टेंबरमध्ये दुष्काळाची स्थिती काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून जोरदार बरसेल असा विश्वास हवामान खात्यानं व्यक्त केलाय. पावसावर विपरीत परिणाम करणा-या एल निनोची निर्मिती होणार नाही असंही हवामान खात्याचा अंदाज आहे.
प्रशांत महासागरात सध्या अनकुल वातावरण आहे. त्यामुळं चांगल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडतोय आणि येत्या 48 तासात तो सुरूच राहील असा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केलाय.
मुसळधार पाऊसाने रत्नागिरीत जीवन विस्कळीत
रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळं जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालंय. राजापूरच्या अर्जूना नदीला पूर आला असल्यानं संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेलीय. बाजारपेठेत सुमारे 5 फूट पाणी साचलंय. शहरातल्या रस्त्यांवरही पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झालीये. तसंच रस्त्यावर उभी करण्यात आलेली तीन वाहने वाहून गेलीयत. मुसळधार पावसामुळं वीजपुरवठा खंडीत झाला असून दुरध्वनी यंत्रणाही कोलमडलीय. अर्जूना नदीबरोबरच खेडमधल्या जगबुडी नदीलाही पूर आल्यानं चौदा गावांचा खेडशी संपर्क तुटलाय. जिल्ह्यातील सर्वच मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

सिंधुदुर्गात जोरदार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मालवण तालुक्.यातल्या आच-यामधअये मोठं नुकसान झालंय. वादळी पावसानं अनेक घरांचं नुकसान झालंय. पहाटेच आचरा वराड आणि चौके गावाला वादळाचा फटका बसलाय. पावसाचा जोर अजूनही सुरू असून 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 67 मिमी पावसाची नोंद झालीय.
सर्वाधिक पाऊस कणकवलीत 120 मिमी, वैभववाडीत 110 मिमी, कुडाळमध्ये 90 मिमी तर मालवणात 70 मिमी पाऊस पडलाय. पावसामुळे नद्यांच्या पातळ्यात वाढ झालीय. जिल्ह्यात पूरपरिस्थिती नसली तरी असाच पाऊस सुरु राहिल्यास पूराचा धोका निर्माण होऊ शकतो.
मुंबईकरांना गुड न्यूज, तलाव भरले!
मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनं तलावक्षेत्रात पाण्याची पातळी वाढतीये. पाऊसमान असंच राहिल्यास लवकरच तलाव ओसंडून वाहू लागतील, अशी स्थिती आहे. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये साडे तेरा लाख दशलक्ष लिटर साठा असणं आवश्यक आहे.
तलावांमध्ये आजच्या घडीला 9 लाख 3 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. वर्षभराच्या पाणीसाठ्यामध्ये 30 टक्क्यांची तफावत असल्यानं कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर महापालिका ठाम आहे. मुंबईकरांना भातसा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, गेली तीन वर्षे हे धरण पूर्ण भरलेलं नाही. यंदा हे धरण भरून वाहू लागतं का याकडेही सर्वांचं लक्ष आहे.