www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापुरातल्या गोळीबारप्रकरणी तीव्र पडसाद उमटले आहेत. विचारे माळ परिसरात २० पेक्षा जास्त चार चाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. १००हून अधिक तरूणांनी ही तोडफोड केलीय. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
गुटख्याची पुडी दिली नाही, या किरकोळ कारणांवरुन तरुणांच्या दोन गटात गोळीबार झाला होता. या गोळीबारात एका तरुणांचा मृत्यू झालाय तर एकजण गंभीर जखमी आहे. कोल्हापुरातल्या रमणमाळा चौकात तरुणांच्या दोन गटात वादावादी सुरू झाली होती. वन विभागाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर गाडीतूनच राजेंद्र यांनी पिस्तुलातून तीन फैरी परत जाणाऱ्या गायकवाड बंधूंवर झाडल्या. अचानक घडलेल्या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. जमलेले नागरिक जीव वाचविण्यासाठी पळत सुटले. गोळीबारात हेमंतच्या डोक्यात गोळी लागल्याने तो जागीच ठार झाला.
या वादावादीतून शशिकांत गायकवाड (२६) आणि हेमंत गायकवाड (३०) या तरुणांवर गोळी झाडण्यात आली. त्यात हे दोन्हीही तरुण गंभीर जखमी झाले. मात्र उपचार सुरू असतानाच हेमंत गायकवाडचा मृत्यू झाला. जखमी झालेले तरुण नगरसेवक राजाराम गायकवाड यांचे पुतणे आहेत. धैर्यशील सावंत, अभिजीत सावंत आणि राजेंद्र सावंत यांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक राजेंद्र सावंत, त्यांची दोन मुले अभिजित आणि धैर्यशील या तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान हे तिन्हीही हल्लेखोर फरार असून पोलीस त्यांचा तपास करतायत. दोन गटांच्या वादातून भर चौकात गोळीबार होण्याची सहा महिन्यांतली ही दुसरी घटना आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.