www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
राज्यातली जनता दुष्काळानं हैराण झालीय. चांगल्या पावसाच्या नुसत्या कल्पनेनंसुद्धा जनतेला हायसं वाटतंय. त्यात भर घालण्यासाठी आम्ही तुम्हाला चांगला पाऊस पडण्याचा संकेत देणारी आणखी एक घटना दाखवतो. काय आहे.
कडाक्याच्या उन्हानं अंगाची लाहीलाही होतेय. थेंबभर पाण्यासाठी गावोगावी संघर्ष सुरू आहे. दुष्काळानं जगणं असहाय्य केलंय. अशा परिस्थितीत सगळे जण आतुरतेनं वाट पहातायत पावसाची....मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्याची बातमी त्यातल्य़ा त्यात दिलासा देणारी.... आता हवामान खात्याच्या अंदाजाला आणखी बळकट करणारे संकेत पक्ष्यांनीही दिलेत. असाच एक संकेत आहे कावळ्याचा... मान्सूनचं आगमन होण्यापूर्वी कावळे घरटी बांधायला सुरुवात करतात. जर कावळ्यानं झाडांच्या शेंड्याला म्हणजे वरच्या भागात घरटं बांधलं तर पाऊस कमी पडतो, असा अंदाज शेतकरी बांधतात. पण कावळ्यांनी जर झाडांच्या मध्यभागी घरटी बांधली तर मात्र चांगला पाऊस अपेक्षित असतो. सुदैवान यंदा कावळ्यांनी घरटी बांधलीयत ती झाडाच्या मध्यावर...
अर्थात कावळ्याच्या घरट्याच्या ठिकाणावरून पावसाचा अंदाज बांधण्याला शास्त्रीय आधार नसला तरी गेली कित्येक वर्ष अनेक भागात याच संकेतावरुन पावसाचं भाकीत होतं. आता तो किती खरा आणि किती खोटा हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण पशू पक्षी निसर्गाच्या जास्त जवळ आहेत. त्यामुळे त्यांना निसर्गाचा अंदाज जास्त असतो, हेही तितकंच खरं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.