मनसेचा गुन्हेगारी स्वातंत्र्यसूर्य(वंशी)!

पुणे महापालिकेनं चक्क चोर, गुन्हेगारांचा सत्कार केलाय. तोही स्वातंत्र्य दिनी.... चोरी, गुन्हेगारीचे आरोप असलेल्या व्यक्तीला महापालिकेनं पुण्याच्या लौकिकात भर घालणारी नामवंत व्यक्ती म्हणून गौरवलंय. गुन्हेगारांच्या या सत्कारासाठी शिफारस केली होती ती, मनसेच्या नगरसेवकांनी...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 19, 2013, 06:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे महापालिकेनं चक्क चोर, गुन्हेगारांचा सत्कार केलाय. तोही स्वातंत्र्य दिनी.... चोरी, गुन्हेगारीचे आरोप असलेल्या व्यक्तीला महापालिकेनं पुण्याच्या लौकिकात भर घालणारी नामवंत व्यक्ती म्हणून गौरवलंय. गुन्हेगारांच्या या सत्कारासाठी शिफारस केली होती ती, मनसेच्या नगरसेवकांनी...
गिर्यारोहण, विज्ञान, खेळ, साहित्य अशा अनेक क्षेत्रातल्या १३९ नामवंतांचा महापालिकेनं गौरव केला. नामवंताचा गौरव करतानाच महापालिकेनं एका चोर-भामट्याचाही सत्कार उरकून घेतला. अविनाश सूर्यवंशी असं त्या सत्कारमूर्तीचं नाव.... याच सूर्यवंशीवर वीज चोरीचा आरोप सिद्ध झालाय. वीज चोरीसाठी सूर्यवंशीनं दंडही भरलाय. त्याचबरोबर बनावट कागदपत्रं सादर करून मालमत्ता बळकावण्यासह अनेक आरोप त्याच्यावर आहे. अशा या सूर्यवंशीचा पुणे महापालिकेनं मात्र पुण्याच्या लौकिकात भर घालणारी नामवंत व्यक्ती म्हणून सत्कार केलाय. तोही मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम देऊन... सुधीर चांदेकर यांच्या जागरूकतेमुळे हा विषय पुढे आला.
पुण्याच्या लौकिकात भर घालणारी व्यक्ती म्हणून सूर्यवंशीचा सत्कार करावा, असं शिफारस पत्र मनसेचे नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी दिलं. बराटे यांना याविषयी विचारलं असता, ते मनसेच्याच नगरसेविका सुशीला नेटके यांचं नाव पुढे करतायत.
सत्कारासाठी शिफारस करताना सूर्यवंशीची पार्श्वभूमी बराटे यांनी जाणून घेतली नाही. महापालिका प्रशासनानंही ती तसदी घेतली नाही. या प्रकारामुळे आता सगळ्याच सत्कारांची महापालिकेने शहानिशा करण्याची गरज व्यक्त केली जातेय...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.