www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
कायद्याच्या चौकटीतच काम करण्यावर ठाम असलेल्या पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेसी यांच्या विरोधात थेट महपौरांनीच दंड थोपटलेत. आयुक्त कोणताही निर्णय घेताना महपौर किंवा इतर पदाधिका-यांना विश्वासात घेत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यामुळे चिडून महापौरांनी महापालिकेची गाडीही परत केली.
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यापासून आयुक्तांनी कोणतीही बेकायदेशीर फाईल पास होऊ दिली नाही. अनेक नगरसेवकही हतबल होऊन यासंदर्भात महापौरांकडे तक्रार घेऊन जात आहेत. आता तर महापौरांनीच उघडपणे आयुक्तांना लक्ष करायला सुरुवात केली आहे. आयुक्त विश्वासात घेत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. एवढंच नाही तर महापौरांनी संतापानं पालिकेची गाडीही परत केलीय. आयुक्त काय तीन वर्षांत येतील आणि जातील पण आम्हाला निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे आयुक्तांनी आम्हाला विश्वासात घ्यावं असं महापौरांनी म्हटलंय.
आयुक्त श्रीकर परदेसी यावर सध्या मौन बाळगून आहेत. पण पारदर्शक कामावर ठाम असलेल्या आयुक्तांना अजित पवार यांचाच पाठिंबा असल्याचं बोललं जातंय.