परदेशी यांची अखेर बदली, अजित पवारांचे अभय खोटे

पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर आज बदली करण्यात आली. पिंपरी-चिंचवडचे बुलडोझर मॅन अशी त्यांची ओळख होती. बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई केल्याने त्यांची राष्ट्रवादीने उचल बांगली केली आहे. त्यांची महानिरिक्षक मुद्रांक शुल्क म्हणून बदली करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 7, 2014, 07:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर आज बदली करण्यात आली. पिंपरी-चिंचवडचे बुलडोझर मॅन अशी त्यांची ओळख होती. बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई केल्याने त्यांची राष्ट्रवादीने उचल बांगली केली आहे. त्यांची महानिरिक्षक मुद्रांक शुल्क म्हणून बदली करण्यात आली आहे.
श्रीकर परदेशी यांचा कार्यकाळ होण्यापूर्वी झाली बदली झाल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे. त्यांची बदली करू नये म्हणून नागरिकांनी आंदोलन केले होते. पिंपरी चिंचवडकरांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्याचे काम सरकारने केले आहे. अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाईची सजा, का देण्यात आली, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे येथे वर्चस्व आहे. पिंपरी चिंचवडमधल्या बेकायदा बांधकामांवर परदेशी यांनी कारवाई सुरू केली होती. एकीकडे नागरिकांकडून या कारवाईचं कौतुक होत असलं तरी ज्यांची बेकायदा बांधकामं आहेत त्यांचा मात्र आयुक्तांवर रोष आहे. असं असलं तरी ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे निवडणुकीचा डोळा ठेवून त्यांची उचलबांगडी करण्यात आले आहे.
दरम्यान, श्रीकर परदेशींच्या समर्थनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आंदोलनाचा इशारा दिला होता. श्रीकर परदेशींची बदली होणार अशी चर्चा होती. आता तर त्यांची बदली झाली आहे. त्यामुळे अण्णा हजारे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
परदेशी हटावचा नारा, अनेकांनी दिला होता. मात्र, आयुक्तांच्या कामाची दखल घेत अजित पवार यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली होती आणि आयुक्तांना अभय दिलं होतं. त्यामुळे पिंपरी पालिकेतल्या पेल्यातील वादळ शांत झालं होतं. मात्र आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नारज असलेले नगरसेवक आणि अधिकारी किती दिवस शांत बसतात हाच खरा प्रश्न, झी मीडियाने उपस्थित केला होता. आज त्यांच्या बदलीने हा प्रश्न खरा ठरला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.