www.24taas.com, पुणे
एलबीटीच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानंही राज्य सरकारची बाजू घेतल्यानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे ‘चर्चेसाठी मी नेहमीच तयार आहे, पण मला कुणीही धमकी देऊ नये’ असा सज्जड इशाराच मुख्यमंत्र्यांनी संपकऱ्यांना दिलाय.
गेल्या महिन्याभरात व्यापाऱ्यांनी एलबीटीच्या मुद्द्यावर तर प्राध्यापकांनी वेतनाच्या मुद्द्यावरून राज्य शासनाला वेगवेगळी आंदोलनं करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण, डाव उलटला आणि तो मुख्यमंत्र्यांच्या पारड्यात पडला. त्यामुळे विरोधी पक्षातील अनेक नेते आणि खुद्द काँग्रेसमधले मुख्यमंत्री विरोधी गटही तोंडावर पडला. खुद्द मुख्यमंत्री म्हणाले असले की ‘मी एकटा पडलेलो नाही...’ तरी हे सत्य आहे की अनेक वेळा त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. काँग्रेसमधील खासदारांनी यासाठी थेट सोनिया गांधींनाही साकडं घालून झालंय.
मुख्यमंत्र्यांना याचबद्दल जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सरळसरळ ‘मला कुणीही धमकी देऊ नये’ असं म्हटलंय. यावेळीच चर्चेसाठी आपण नेहमी तयार आहोत. परंतू व्यापाऱ्यांनी जनतेला आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरणं अगोदर थांबवावं, असा सज्जड इशाराच त्यांनी दिलाय. यावेळीच ‘गेल्या आठवड्यात पूर्वनियोजित दौर्या,साठी मी दिल्लीला गेलो होत... पण यावेळी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. कोणाला काय छापायचे ते छापू द्या’ असं म्हणत विरोधकांचीही हवा मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलीय.