www.24taas.com, सातारा
बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करणार पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त साता-यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटलांची शेव्रलेट गाडी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली.
कर्मवीरांची ही शेव्रलेट गाडी साता-यातील मिरणुकीत आकर्षणाचं केंद्र ठरली होती. काही काळ या गाडीतून कर्मवीरांनी शिक्षणक्रांती घडवण्यासाठी राज्यभर प्रवास केला होता. राजर्षी शाहु महाराज यांच्यापासून शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. 1919 ते 1959 या काळात संस्थेचे अध्यक्ष असताना शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. या काळात त्यांना उच्च रक्तदाब, संधीवात अशा व्याधीही जडल्या. मात्र त्यांचं कार्य थांबलं नाही.
1945 मध्ये त्यांना फलटणचे श्रीमंत मालोजी राजे नाईक निंबाळकर आणि तात्यासाहेब तडसरकरांनी फोर्ड व्ही 8 गाडी देऊ केली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. त्यानंतर कापीलमधल्या विद्यार्थी काँग्रेस मेळाव्यात कर्मवीरांना सातारा जिल्हा काँग्रेसकडून एक लाख अकरा हजारांची देणगी जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आली. गाडीचा खर्च संस्थेवर पडणार नाही याची हमी विद्यार्थ्यांनी घेतल्यानंतर कर्मवीरांनी ही गाडी स्वीकारली. त्यातनंतर BYF 5301 या क्रमांकाची ही शेवरलेट गाडी 9,195 रूपयांना खरेदी करण्यात आली.
रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांना या गाडीची चांगलीच मदत झाली. आज राज्यात संस्थेची 438 विद्यालये, 68 वसतीगृह, 41 महाविद्यालये, 28 प्राथमिक शाळा, 17 पूर्वप्राथमिक शाळा आणि 8 आश्रमशाळा ज्ञानाचा प्रसार करताहेत. या मिरवणुकीच्या निमीत्ताने कर्मवीरांची गाडी पाहण्याची संधी मिळाल्यानं कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
ज्ञानाची गंगा खेडोपाडी पोचवण्याची कर्मवीर भाऊराव पाटलांची तळमळ होती. आणि त्यांच्या या कार्याला गती देण्याचं भाग्यच जणू या गाडीला मिळालं होतं.