www.24taas.com, पुणे
तरूणींमध्ये मद्यपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशीच घटना पुण्यात घडली आहे. स्वत:च्याच वाढदिवसानिमित्त आपल्या मित्रांना दिलेल्या पार्टीत अतिमद्यसेवन केल्याने सनम हसन या १९ वर्षाच्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. सनम हसनने मित्रांसोबत पार्टीमध्ये विविध प्रकारची दारू एकाच वेळी पिल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे .
पुण्यात नुकताच काही दिवसांपूर्वी ७००-८०० लहान मुलांच्या चिल्लर पार्टीने दारू पार्टी केली होती. आणि त्यानंतर काहीदिवसातच दारूच्या अतिसेवनामुळे तरूणीला आपला जीव गमवावा लागला आहे. वडगाव शेरीभागातील ब्रम्हा-सनसिटी सोसायटीतील एका फ्लॅमधे सनम हसन आणि तिच्या २० ते २२ मित्र - मैत्रिणींची कॉकटेल पार्टी सुरु झाली. वाढदिवस असल्याने सनमला पार्टीतल प्रत्येकाकडून दारू पिण्याचा आग्रह होत होता. थोड्याच कालावधीत व्हिस्की, व्होडका आणि बियर पिल्याने तीची तब्बेत बिघडली.
सोबतचे मित्र - मैत्रिणंही तिच्याच वयाचे असल्याने त्यांनी तिला लिंबू -पाणी पिण्यास देऊन झोपवलं. मात्र थोड्याच वेळात बेशुद्ध पडल्याने तिला पहाटे एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. मुंबईत अंधेरी भागात रहाणारे सनम हसनचे आई - वडील घरी नियमित दारू पित असल्याने सनमलाही आधीपासूनच दारू पिण्याची सवय होती, असं तिच्या मित्र - मैत्रिणींच म्हणणं आहे.