www.२४taas.com, पुणे
पुण्यात आचारसंहिताभंग करुन राजकीय नेते थांबलेले नाहीत, तर निवडणूक कर्मचा-यांना मारहाणीपर्यंत त्यांची मजल गेलीय. निवडणूक कर्मचा-यांना मारहाण आणि कॅमेरा फोडण्याचा प्रकार पुण्यात घडलाय. काँग्रेसचे उमेदवार चंद्रशेखर घाटे यांनी ही प्रताप केलाय. या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही पुण्यात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार चंद्रशेखर घाटे मतदारांना फडके हौद चौकात भेटवस्तू वाटत असल्याचं समोर आलंय. यासंबंधी निवडणूक आयोगाच्या कर्मचा-यांना फोन आल्यानंतर निवडणूक आयोगाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रकाराचं शूटिंगही केलं. पण यावेळी अजय गोळे आणि हेमंत यात्रे या दोन कर्माचा-यांना मारहाण करण्यात आली.
आचारसंहिता भंगाच्या घटना पुण्यात घडल्याएत मात्र त्यात कर्मचा-यांना मारहाणीची ही पहिलीच घटना आहे. फक्त मारहाण करून घाटे आणि त्यांचे कर्मचारी थांबले नाहीत. तर त्यांनी कॅमेरा देखील फोडला. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये घाटेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या घटनेमुळे निवडणूक कर्मचा-यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेचा निषेध म्हणून कर्मचारी संघटनांनी महापालिकेत काही काळ कामबंद ठेवलं होतं.