मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
अण्णा हजारेंच्या समर्थकांनी काही ठिकाणी थेट निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. तर नाशकात त्यांनी प्रबोधन आणि प्रचाराचं काम हाती घेतलं आहे. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे स्वयंसेवक प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यालयात जाऊन महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार कसा असावा याचं निवदेन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देत आहेत.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या प्रवित्र्यानांतर काही राजकीय पक्षांनी चांगले उमेदवार देण्याचं आश्वासन दिलं आहे. उमेदवारी वाटपाच्या आधी नागरिकांनीच त्यांच्या वॉर्डातल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांची नावे पक्ष कार्यालयाकडे द्यावी अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली आहे.
मात्र नागरिक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांशी पंगा घेतील का ? राजकारण्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार माहित नाहीत का ? असे प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात. थोडक्यात राजकीय पक्षांना उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीशी काहीही देणंघेणं नाही तर फक्त निवडून येण्याचा निकषच महत्वाचा असल्याचं दिसून येत आहे.