बॉक्सिंग जगज्जेतीलाही झालाय वासनांधाचा त्रास!

बॉक्सिंगची जगज्जेती! तेही पाचवेळा. तिच्या वाटयाला कोण जाईल? तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत कोण करणार? जो कोणी हे धाडस करेल त्याची काही खैर नाही. असं आपल्या वाटत असेल पण नाही, पाचवेळची जगज्जेती बॉक्सर मेरी कोमला विश्वविजेती होण्याआधी सुरुवातीच्या दिवसात असा वाईट अनुभव आला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 1, 2013, 04:05 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
बॉक्सिंगची जगज्जेती! तेही पाचवेळा. तिच्या वाटयाला कोण जाईल? तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत कोण करणार? जो कोणी हे धाडस करेल त्याची काही खैर नाही. असं आपल्या वाटत असेल पण नाही, पाचवेळची जगज्जेती बॉक्सर मेरी कोमला विश्वविजेती होण्याआधी सुरुवातीच्या दिवसात असा वाईट अनुभव आला आहे.
सोमवारी मुंबईत या प्रसंगाविषयी सांगताना या जगज्जेतीच्या डोळ्यात काही क्षण अश्रूही तरळले. ‘मणीपुरी पद्धतीचा पायघोळ घागरा घालून मी एका ठिकाणी जाण्यासाठी रिक्षात बसले. मला एकटीला बघून आडवळणाच्या रस्त्याने रिक्षावाल्याने रिक्षा घेतली. आजूबाजूला वर्दळ नाही हे पाहून त्याने माझ्याशी शाब्दीक छेडछाड करायला सुरुवात केली. पायघोळ घागऱ्यामुळे मला सुरुवातीला त्याच्यासोबत लढणे कठीण गेले. पण तरीही मी माझ्या हातांनी बॉक्सिंगचा इंगा त्याला दाखवलाच `, मेरीने तो किस्सा अश्रू टीपत सांगितला.
`सुदैवाने त्याचवेळी दोन फुटबॉलपटू तिथून जात होते. त्यांनी थांबून माझी मदत केली, केवळ बॉक्सिंगची चांगली जाण असल्याने मोठा अनर्थ टळला. सध्याच्या मुलींनी स्वरक्षणार्थ कराटे, बॉक्सिंग किंवा मार्शल आर्टचे शिक्षण घ्यावे. शिक्षणाप्रमाणे ही विद्याही वाया जाणार नाही `, असा संदेशही मेरीने आताच्या मुलींना दिला. कधी इंग्लिश, तर मध्येच तोडकेमोडके हिंदी अशा भाषांमध्ये या ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेत्या बॉक्सरने दिलखुलास गप्पा मारल्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ