www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली/ राळेगणसिद्धी
संसदेच्या या अधिवेशनातच लोकपाल विधेयक संमत करावं, त्यासाठी गरज पडल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा लागला तरी वाढवावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषद घेतली.
अण्णांनी पाठींबा दिलेल्या सरकारी लोकपाल केजरीवाल यांचा मात्र विरोध असल्याचा प्रश्न अण्णांना विचारल्यावर अरविंदनं बिल नीट वाचलेलं दिसत नाही, असा टोला अण्णांनी लगावला.
केंद्र सरकारनं राज्यसभेत मांडलेल्या जनलोकपाल विधेयकावर उद्या चर्चा होऊन मतदान होण्याची शक्यता आहे. हे विधेयक संमत करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
एकीकडे अण्णांनीही लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींची सही होत नाही तोवर उपोषण सोडणार नाही असा अल्टीमेटम दिलाय. लोकपाल विधेयकाला राज्यसभेत काँग्रेस, भाजप, बसपा, माकप, तृणमूल काँग्रेसनं पाठींबा दिलाय. तर समाजवादी पक्ष, द्रमुक, तेलगू देसम यांनी विरोध केलाय.
दरम्यान, भाजप-काँग्रेस यांचा या विधेयकाला पाठींबा असला तरी शिवसेनेनं याला विरोध केलाय. सत्ताबाह्य केंद्र नको, त्यापेक्षा राष्ट्रपतींना अधिकार द्या, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.