खाजगी टँकर्सचालकांकडून नाशिककरांची लूट

दुष्काळ आणि मे महिना.... त्यामुळे नाशिकमध्ये टँकर्सची मागणी वाढलीय. पण आता खाजगी टँकर्सचालकांनी नाशिककरांची अक्षरशः लूट चालवली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीनं नाशिकमध्ये पाणी विकलं जातंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 2, 2013, 05:05 PM IST

www.24taas.com, नाशिक
दुष्काळ आणि मे महिना.... त्यामुळे नाशिकमध्ये टँकर्सची मागणी वाढलीय. पण आता खाजगी टँकर्सचालकांनी नाशिककरांची अक्षरशः लूट चालवली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीनं नाशिकमध्ये पाणी विकलं जातंय.
नाशिक शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणा-या धरणांनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत लग्नसराई सुरु झाल्यानं नागरिकांची पाण्याची मागणी वाढत आहे. प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे टँकर पोहचू शकत नसल्यानं खाजगी टँकर चालकांचं चांगलंच फावतंय. त्यामुळे हे टँकरचालक नाशिककरांकडून अवाच्या सव्वा पैसे आकारत आहेत. डिझेलच्या किमती वाढत असल्यानं दर वाढत असल्याचं टँकर चालकांच म्हणणं आहे. तर या खाजगी टँकरचालकांवरही सरकारचं नियंत्रण असावं, अशी नाशिककरांची मागणी आहे.

टँकरचालकांकडून सुरू असलेल्या लुटीबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या, तर कारवाई करू, असं आश्वासन प्रशासनानं दिलंय. शहरी भाग असो वा ग्रामीण पाण्याची समस्या सगळीकडे सारखीच आहे. मुलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारल्यानं नाशिककरांवर विनाकारण बोजा पडतोय.