www.24taas.com, नाशिक
नाशिकमधून वाहणारी गोदामाई म्हणजे नाशिकची ओळख...मात्र आता तिच गोदावरी ओळखली जाते ती तिच्या प्रदुषणाबद्दल...पण याबद्दल प्रशासन काहीच करताना दिसत नाही..त्यामुळे गोदावरीचं पाणी आरोग्यास धोकादायक आहे अशा आशयाचे फलक लावण्याचे आदेश महापालिकेला उच्च न्यायालयाने दिले आहेत...न्यायालयाच्या आदेशामुळे कुंभमेळ्यासाठी तयारी करणा-या महापालिकेवर चांगलीच नामुष्की ओढवली आहे.
नाशिक मधून कधीकाळी अवखळपणे वाहणारी गोदामाई म्हणजे नाशिककरांचं वैभव, नाशिककरांचा श्वास होता. मात्र नाशिक महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे हा श्वासच आता कोंडला गेलाय. ज्या गोदामाईचं पाणी लाखो भाविक आजपर्यंत तीर्थ म्हणून प्राशन करायचे. ज्यात स्नान केल्यानंतर पवित्र झाल्याची भावना व्हायची. तेच पाणी आता धोकादायक असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असून ज्या ज्या ठिकाणी भाविकांची जास्त गर्दी असते त्या ठिकाणी पाणी आरोग्यास धोकादायक असल्याचे फलक लावण्याचे आदेश नाशिक महापालिका प्रशासनाला देण्यात आलेत. गोदावरी गटारीकरण विरोधीमंचच्या कार्यकर्त्यांनी गोदा प्रदूषणमुक्त करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्यावरील सुनावणी दरम्यान १४ दिवसात हे फलक लावण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिलेत.
मात्र महापालिका प्रशासनकडून अजूनही गटारीच्या पाण्याने नाही तर कपडे-गाड्या धुणे आणि निर्माल्यामुळेच नदी प्रदुषित होत असल्याचा दावा केला जातोय. गोदावरी प्रदूषणमुक्त करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर साधू संतांनीही अनेक वेळा केलीय. मात्र त्यांच्या मागण्यांना प्रत्येकवेळी केराची टोपली दाखविण्यात आलीय. २०१५ मध्ये नाशकात कुंभमेळा भरणार आहे. त्याच्या नियोजनाच्या तोंडावरच गोदावरीचं पाणी धोकादायक असल्याचे फलक लावण्याची नामुष्की महापालिकेवर येते. या संदर्भात संत महंत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती करणार आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांसह अनेक विभागाच्या अधिका-यांचं पथक अलाहाबादचा दौरा करून आलं. मात्र अद्याप आराखडा केवळ कागदावरच दिसतोय. त्यातही सगळ्यात आधी गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. तरच नाशकात येणा-या लाखो भाविकांना दुषित पाण्याचा नाही तर तीर्थ प्राशन केल्याचा अनुभव मिळेल...