स्वस्त भाजीपाला केंद्राची `कांदेदुखी`!

नाशिकमध्ये स्वस्त भाजीपाला केंद्रांचा पुरता बो-या वाजलाय. त्याचं खापर कृषिमंत्र्यांनी नाशिकच्या अधिका-यांवर फोडलंय. त्यातच कांद्याच्या बाबतीत सरकारनं जो घोळ चालवलाय,

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 19, 2013, 08:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये स्वस्त भाजीपाला केंद्रांचा पुरता बो-या वाजलाय. त्याचं खापर कृषिमंत्र्यांनी नाशिकच्या अधिका-यांवर फोडलंय. त्यातच कांद्याच्या बाबतीत सरकारनं जो घोळ चालवलाय, त्याला सामान्य माणूस पुरता वैतागलाय. स्वस्त भाजीपाला केंद्र काढायचीच होती, तर त्या केंद्रात कांदे स्वस्त दरानं का देत नाहीत, असा सवाल नाशिककरांनी केलाय.
सर्वसामान्यांना माफक दरात भाजीपाला उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारनं मोठा गाजावाजा करत स्वस्त भाजीपाला केंद्र सुरू केली. महत्त्वाचं म्हणजे या योजनेची सुरुवात नाशिकपासून झाली..... पण आज नाशिकमध्येच या योजनेचा पुरता बोजवारा उडालाय. ३२ केद्रांपैकी जेमतेम ८ ते १० केंद्र सध्या सुरू आहेत. याचं खापर मंत्रीमहोदयांनी अधिका-यांवर फोडलंय.
कांद्यानं भाव खात सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. पण स्वस्त कांदे विकण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतलेला नाही. त्यातच कांद्यावरुन उलटीसुलटी विधानं करुन सर्वसामान्यांना आणखी कोड्यात टाकण्याचंच काम केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे.
कांदा व्यापारी कांद्याची साठवणूक करतात, अशी ओरड करणारं सरकार आता कृत्रिम टंचाई नाही अशी म्हणत व्यापाऱ्यांची बाजू घेतंय. शेतक-यांना कांद्याचा योग्य दर मिळायला हवा आणि सर्वसामान्यांनाही योग्य किमतीत कांदा मिळायला हवा. हा बॅलन्स साधणं शक्यही आहे.... गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची.....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.