भेसळयुक्त तेल आणि तुपाचे साठे जप्त

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशकात अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाईला सुरवात केलीय. आठवड्याभरातच भेसळीच्या संशयावरून २५ लाख रुपयांचा तेल आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 26, 2013, 10:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशकात अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाईला सुरवात केलीय. आठवड्याभरातच भेसळीच्या संशयावरून २५ लाख रुपयांचा तेल आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आलाय. विभागाच्या कायद्या अंतर्गत सर्वसामान्य ग्राहकांनाही मिठाई तपासण्याच्या अधिकार आहे. मात्र विभागामार्फत याविषयी जनजागृती केली जात नसल्याने कायदा असून नसल्या सारखाच आहे.
दिवाळीत घराघरात वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविण्याची लगबग सुरु असते. तशीच तयारी बाजारातही सुरु असते. मात्र भेसळखोर जी तयारी करतात तो तुमच्या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नाही तर आनंदावर विरजण घालण्यासाठी... दिवाळी आली की गोड पदार्थ, खवा, यांच्यात भेसळ करणा-या टोळ्या सक्रीय होतात. आता तर एक पाउल पुढे टाकत भेसळखोरांनी थेट खाद्य तेल आणि वनस्पती तुपातच भेसळीला सुरवात केलीय. नाशिकच्या शरदचंद्र पवार मार्केट मधील एका व्यापा-याच्या गोडावून मधून भेसळीच्या संशयावरून १५ लाख रुपयांचा तेलाचा साठा अन्न औषध प्रशासन विभागान जप्त केलाय. आठ दिवसात विविध ठिकाणच्या कारवाईचा हा आकडा २५ लाखापर्यंतचा आहे.
मिठाईच्या काही दुकानदारांकडूनही ग्राहकांची फसवणूक होतेय. भेसळयुक्त पदार्थ बरोबरच बुरशी लागलेल्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्याची तक्रार आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे. यासाठीच अन्न सुरक्षा– मानके कायद्या २००६, अंतर्गत प्रत्येक ग्राहकाला खाद्य पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे अधिकार आहेत. या कायद्याची अंमलबजावणी २०११ पासून देशभर सुरु झालीय मात्र त्याची माहीतच ग्राहकांना नसल्याने केंद्राचा कायदा असून नसल्या सारखाच अशी भावना व्यक्त होतेय.
ग्रहाक चळवळ सुदृढ करण्यासाठी आणि भेसळखोरांवर वचक ठेवण्यासाठी या कायद्या विषयी जनजागृती करणं आवश्यक आहे. मात्र कुठल्याही पदार्थाचे नमुने घेण्याची पद्धत अत्यंत क्लिष्ट असल्यानं आधीच पैसे देवून फसलेल्या सर्वसामान्य ग्राहकाचीच खडतर परीक्षा घेणारी आहे. त्यामुळे भविष्यतही या कायद्याचा ग्राहकांना किती उपयोग होणार याविषयी प्रश्नचिन्हच उपस्थित होतय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.