'चोरी यशस्वी कर गं माते'; एक धार्मिक चोरी...

चोरट्यांनी चोरी करण्यासाठीची एकही जागा शिल्लक ठेवलेली नाही. अगदी देवाची मंदिरेही चोरट्यांनी सोडलेली नाही. पण, नाशिकमध्ये एक ‘धार्मिक’ चोर चोरी करण्याआधी देवीला नमन करायला मात्र विसरला नाही...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 24, 2013, 04:04 PM IST

www.24taas.com, नाशिक
चोरट्यांनी चोरी करण्यासाठीची एकही जागा शिल्लक ठेवलेली नाही. अगदी देवाची मंदिरेही चोरट्यांनी सोडलेली नाही. पण, नाशिकमध्ये एक ‘धार्मिक’ चोर चोरी करण्याआधी देवीला नमन करायला मात्र विसरला नाही...
नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यातील कोटमगावच्या जगदंबेच्या मंदिरातही चोरट्याने हात साफ केलेत. जगदंबेच्या मंदिरात शिरलेला हा चोर भलताच भाविक निघाला. पहाटेच्या सुमारास मंदिरात शिरलेल्या चोरट्यानं पहिल्यांदा जगंदेबेला साष्टांग नमस्कार केला आणि त्यानंतर चोरी करण्यास सुरुवात केली. देवीला नमन करणाऱ्या या चोरानं देवीच्या दोन दानपेट्या फोडल्या. डोक्याला गुंडाळलेल्या भगव्या रुमालात त्यानं सगळ्या माल भरला. त्यानंतर देवीच्या गाभाऱ्यात तो शिरला.

गाभाऱ्यात लावलेल्या तीन चांदीच्या छत्र्या त्यानं चोरुन नेल्या. चोरट्याची ही सगळी चोरी सीसीटीव्हीत कैद झालीय. येवला पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतलं असलं तरी धार्मिक असलेल्या या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही.