www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिककरांवर पुन्हा एकदा घरपट्टीवाढीचा बोजा पडण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनानं तब्बल १३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी पाठविलाय. विरोधकांनी मात्र या घरपट्टीवाढीला कडाडून विरोध केलाय.
नाशिक महापालिकेनं घरपट्टीत १३ टक्यांनी दरवाढ करण्याचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केलाय. याआधी विरोधी पक्षांनी प्रशासनाचा हा प्रयत्न हाणून पाडलाय. तरीही यंदा जादा विषयात छुप्या पद्धतीनं प्रशासनानं प्रस्ताव सादर केल्यानं विरोधक आक्रमक झालेत. सभागृहाबरोबरच रस्त्यावर उतरून प्रशासनाचा विरोध करण्याचा इशारा देण्यात आलाय.
स्थायी समितीमध्ये व्यवसायिकांच्या घरपट्टीत दरवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर महासभेच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आलाय. तसंच गावठाण आणि सिडको वसाहत त्यातून वगळण्यात येईल, असं सूचक विधान करत करत स्थायी समिती सभापती प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचा दावा करत आहेत.
गेली दहा वर्षं नाशिक महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता होती. या दहा वर्षांच्या काळात सत्ताधा-यांनी नागरिकांवर दरवाढीचा बोजा टाकला नाही. मात्र मनसेच्या एक वर्षाच्या काळात दुस-यांदा दरवाढीचा प्रास्तव येतोय. स्वाभाविकच सत्ताधारी मनसेच्या कारभारावर टीका होतेय. मात्र स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या लक्षात हा विषय कसा आला नाही, स्थायी समिती सभापतीपदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं मनसेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे शिवसेना किती विरोध करणार याचं उत्तर आगामी महासभेतच मिळणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.