www.24taas.com, धुळे
पावसाच्या आकडेवारीवरून राज्य सरकारनं दुष्काळी तालुक्याची घोषणा केली. मात्र धुळे जिल्ह्यात याच आकडेवारीच्या सावळ्या गोंधळामुळे साक्री तालुक्याला राज्य सरकारच्या मदतीपासून वंचित रहावं लागलंय. या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतांनाही प्रशासनानं दिलेल्या चुकीच्या आकडेवारीच्या खेळात जनतेचा बळी गेलाय.
साक्री तालुक्यांत 13 ऑगस्टपर्यंत कृषी विभागाच्या एका आकडेवारीनुसार 207 मिलीमीटर पाऊस पडला असताना पालक सचिवांसमोर मांडण्यात आलेल्या अहवालात 221 मिलिमीटर पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली. अशाच लालफितीचा फटका धुळे, शिंदखेडा, आणि शिरपूर तालुक्यांनाही बसलाय. मात्र तरी देखील जिल्हा प्रशासन आकडेवारी बरोबर असल्याचा दावा करतंय.
जिल्ह्यात पावसाच्या आकडेवारीत घोळ करणा-या कृषी विभागाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची आता मागणी होतेय. सरकारनं पावसाची आकडेवारी सुधारुन साक्री तालुक्याला न्याय द्यावा आणि दुष्काळी तालुका म्हणून घोषित करावं असं जनतेला वाटतंय. मात्र हितसंबंध जोपासणारं सरकार खरोखर अन्याय झालेल्या तालुक्याला न्याय देतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.