www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये पहिल्या पावसातच राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्ट गोदापार्कची दयनीय अवस्था झालीय. शिवसेनेत असताना राज ठाकरेंनी गोदापार्कचं स्वप्न राज यांनी बघितलं, साकारलं.. मात्र आता तेच गोदापार्क सावरण्याची वेळ मनसे अध्यक्षांवर आलीय.
गोदावरीच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेलं गोदापार्क हे राज ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट. २००९च्या पुराचा फटका बसलेलं गोदापार्क अजूनही सावरताना दिसत नाहीये. गटाराचं पाणी धबधब्यासारखं गोदापार्कवरून वाहतंय. तर कुठे मातीचे ढिगारे साचलेत. मनसे गोदापार्कची निगा राखू शकत नाही अशी टीका आता होऊ लागलीय.
मध्यंतरी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी गोदापार्क परिसराची पाहणी केली. गोदावरीच्या दुसऱ्या तिरावरची जागाही पार्कसाठी आरक्षित करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी अधिका-यांना दिलेत. ब्लू प्रिंटमध्येही गोदापार्कला प्राधान्य असल्याचं दिसून येतंय.
राज ठाकरे शिवसेनेत असताना नाशिकमधले शिवसेनेचे स्थानिक नेते गोदापार्कचं तोंडभरून कौतुक करायचे. आज मात्र तेच नेते गोदापार्कवर टीका करतायत. त्यामुळे गोदापार्कच्याच मुद्द्याचं राजकारण होताना दिसतंय. मात्र राजकारणात हा चांगला प्रोजेक्ट फुकट जाऊ नये अशी इच्छा नाशिककर नागरिकांची आहे..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.