मनसेच्या वसंत गीते आणि भुजबळांचं साटंलोटं असल्याचा आरोप करत हेमंत गोडसेंनी शिवसेनेत प्रवेश केला. गीतेंनी भुजबळांसमोर लोकसभेची निवडणूक लढवावी, असं आव्हानही गोडसेंनी दिलंय. आता राज ठाकरे याबद्दल काय बोलतात, याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय.
एरवी मनसे अध्यक्ष दोन पक्षांमधल्या फिक्सिंगचे आरोप सर्रास करतात. पण आता असे आरोप मनसेवरच होऊ लागलेत. आणि तेही पक्षात पाच वर्षं काम करणा-या नगरसेवकाकडून...
दोन दिवसांपूर्वीच मनसेच्या एकाधिकारशाहीला कंटाळून हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गीते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांचं साटंलोटं आहे, असा खळबळजनक आरोप करतच त्यांची शिवसेनेत एन्ट्री झाली. आगामी लोकसभा निवडणूक भुजबळांना सोपी जावी, यासाठी कमकुवत उमेदवार उभा करण्यासाठी गीतेंचा प्रयत्न सुरु आहे. स्थानिक नगरसेवकांना राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचू दिलं जात नाही. वसंत गिते राज ठाकरेंची दिशाभूल करतायत. असे घणाघाती आरोप करत गीतेंनी भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढवावी असं आव्हान गोडसेंमी दिलंय. या आधी मनसेतून शिवसेनेत गेलेल्या प्रताप मेहरोलिया यांनी तर मनसे हा मॅनेज पक्ष असल्याच आरोप केलाय. वसंत गितेंनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलंय आणि गोडसेंवर तोंडसुखही घेतलंय.
मनसेमध्ये भुजबळांच्या कारणानं असंतोष उफाळून आलाय. मनसेच्या पुढच्या वाटचालीसाठी ही निश्चितच चिंतेची बाब ठरणार आहे. नाशिकच्या विकासाबाबत पाच वर्ष थांबाचा सल्ला देणारे राज ठाकरे या गंभीर आरोपांबाबत कधी आणि काय भाष्य करतात याकडे नाशिककरांच लक्ष लागलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.