www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे ओएसडी राहिलेले संदीप बेडसे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं उघड झालंय. मैत्री इंफ्रास्ट्रक्चर या कंपनीत दोघांच्या परिवारातील सदस्य डायरेक्टर शेअर होल्डर असल्याचा खुलासा किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये केला. सार्वजनिक बांधकाम मंत्रीसुद्धा अधिका-यांसोबत ठेकेदारी करत असल्याने राज्यपालांनी मंत्र्यांना घरी पाठवावे अशी मागणी करत त्यांनी भुजबळांची चौकशी करण्याचीही मागणी लाचलुचपत विभागाकडे केली.
मैत्री इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची कागदपत्रंच आज सोमय्या यांनी सादर केले. यातील सदस्यांची नावं बघितली तर यात नाव दिसेल निशिकांत त्र्यंबकराव बेडसे. हे बेडसे म्हणजे भुजबळांचे ओएसडी राहिलेले संदीप बेडसे यांचे बंधू तर भावेश आणि परवेश कन्स्ट्रक्शनमध्ये पंकज आणि समीर भुजबळ यांची नावं आहेत. किरीट सोमय्या यांनी दिलेल्या कागदपत्रात विविध कंपन्यांचे सदस्य आणि शेअर होल्डर हे भुजबळांशी संबंधित असल्याचे आरोप केले आहेत. नावं केवळ दिखाव्यापुरती असली तरी थेट व्यवहाराने फायदा भुजबलांना मिळतो असं सांगत किरीट सोमय्या यांनी भुजबळांवर शरसंधान केलंय.
बेडसे सारख्या शासकीय अधिकाऱ्यांवर राजकारण्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागात ही लूट संगनमताने होत असल्याचा आरोप करत सोमय्यांनी भुजबळांचा राजीनामा घ्यावा, असं आवाहन केलंय.
‘आपण सारे भाऊ भाऊ मिळून वाटून सारे खाऊ’ या उक्तीप्रमाणे बांधकाम विभाग राज्यात सार्वजनिक कार्य करत असल्याच सोमय्या यांनि उघड केलंय. मंदिरांच्या या नगरीत आता हे सर्व जण मिळून पद्मनाभ मंदिराची तर उभारणी करत नाही ना, अशी चर्चा आता नाशिककारांमध्ये रंगली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.