www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा येथे घडलेल्या दलित तरुणाच्या हत्येबाबत अभिनेता नाना पाटेकर याने संताप व्यक्त केला आहे. जाती धर्मावरून अशा हत्या घडणं हे लांच्छनास्पद असल्याची टीका नाना पाटेकर यांनी केलीय. तर पिडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.
दरम्यान, जामखेड तालुक्यातील खर्डा येथे घडलेल्या दलित तरुणाच्या खुनाच्या घटनेनंतर तब्बल ६ दिवसांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आज खर्डा येथे जाऊन पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. सुरुवातीलाच त्यांनी उशीर झाल्याबद्दल खेद व्यक्त करत पिडीत कुटुंबाला शासनाकडून ५ लाखाची मदत जाहीर झाली असल्याचे सांगितले. त्याच बरोबर अशा घटना वारंवार घडू नये यासाठी हे प्रकरण फास्टट्रक कोर्टामध्ये चालवणार असून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केल्याचा देखील खुलासा मधुकर पिचड यांनी केला आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या मागासवर्गीय सेलकडून ५ लाखाची मदत येत्या २ दिवसात देणार असल्याचे राष्ट्रवादी-कॉंग्रेस मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश गजबे यांनी जाहीर केले.
अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा गावातील दलित युवकाच्या हत्या प्रकरणी सरकारला अखेर जाग आली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलीय. आंतरजातीय प्रेमप्रकरणातून नितीन आगे या दलित युवकाची सवर्णांनी गावात दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या केली. तर दुसरीकडे नितीन आगेच्या खून प्रकरणी आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करू असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.