www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
नेहमी शिक्षकांचा धाक, शिक्षकांची शिस्त असल्या गोष्टींची चर्चा होते. मात्र, अहमदनगरच्या शिक्षकांनी या सर्व आदर्शांना तिलांजली देत थेट रस्त्यात लुंगी डान्स करण्याचा पराक्रम केला. आपल्या विद्यार्थ्यांचं यश साजरं कऱण्यासाठी या शिक्षकांनी हा लुंगी डान्स केला.
अहमदनगरच्या इचरजबाई फिरोदीया प्रशालेचे आदरणीय शिक्षक रस्त्यात लुंगी डान्सच्या ठेक्यावर बेधूंद नाचताना लोकांनी पाहिले. प्रज्ञाशोध परीक्षेत शाळेचा निकाल ७० टक्के लागला म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांनी थेट डीजे लावून यशस्वी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली. मात्र या डीजेच्या तालावर थिरकण्याचा मोह या शिक्षकांना आवरला नाही. मग शिस्त, नियम धाब्यावर बसवत, हात वर करत, रस्त्यात लुंगी डान्स केला... यात शिक्षिकाही मागे नव्हत्या.
प्रज्ञाशोध विद्यार्थ्यांचं यश साजरं करण्यासाठी शाळेने गाणीही प्रज्ञावान निवडली होती. लुंगी डान्स, चिकनी चमेली, ढगाला लागली कळ, हाताला धरलं या.... या गाण्यांवर नाचत शिक्षकांनी आपला आनंद व्यक्त केला. आपलेच शिक्षक रस्त्यात नाचतायत हे पाहिल्यावर मग विद्यार्थ्यांनाही नाचण्याची आयती संधी मिळाली. शाळेचे मुख्याध्यापकही मग चिकनी चमेलीवर थिरकले.
याचावर कळस चढवला तो प्रांताधिकारी राजेंद्र पाटलांनी. तेही मुख्याध्यापकांसोबत शिट्ट्या फुंकत नाचू लागले. विद्यार्थ्यांना शिकवून आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच जर असे भर रस्त्यात धिंगाणा घालायला लागले तर समाजात कसला आदर्श निर्माण होणार. विद्यार्थी चुकले तर त्यांचा कान धरणा-या या शिक्षकांचा कान आता कोण धरणार?
व्हिडिओ पाहा :
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.