www.24taas.com, झी मीडिया, गडचिरोली
गडचिरोलीमध्ये काल नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांचा गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांना विसर पडलाय, असंच दिसतंय.
काल, गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात नक्षलविरोधी दलाच्या कामांडरसह सात जवान शहीद झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यातील शहीदांना आज मानवंदना देण्यात आली. पण, यावेळी राज्याचे गृहमंत्री मात्र इथं उपस्थित नव्हते.
याबद्दल स्पष्टीकरण विचारलं गेलं असता, मी उशीरा उपस्थित राहिलो तर अधिक चांगलं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हतो, असं विधान आर आर पाटील यांनी केलंय.
मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर आपलं मंत्रिपद गमावणाऱ्या गृहमंत्री आर आर पाटील यांना आत्ता तरी वेळेचे आणि परिस्थितीचं भान असावं, एव्हढीच जनतेची इच्छा आहे.
काय घडलं होतं नेमकं…
काल सकाळी 9.40 वाजल्याच्या सुमारास पोलीस अधिकारी जिल्ह्यातील चामोरशी तालुक्याच्या पावीमुरंदा आणि मुरमुरी गावांतल्या जंगलात सुरू असलेल्या आपल्या अभियानासाठी जात होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले सर्व पोलीस महाराष्ट्राच्या विशेष सी-60 नक्षलविरोधी अभियान दलाचे सैनिक होते. मुरमुरी-चामुरीमधून त्यांचं वाहन जात असतानाच हा भूसुरुंग घडवण्यात आला. सुरुंग स्फोटानंतर पोलीस आणि माओवाद्यांमध्ये गोळीबारही झाला. सुनील मादवी, रोहन दंबाडे, सुभाष कुमरे, दुर्योधन नाकतोडे, तिरुपती आलम, लक्ष्मण मुंडे (सुमो चालक) अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत तर जखमींना हवाई मदतीनं नागपूरला आणलं गेलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.