ताडोबात आला नवा पाहुणा!

वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात आता एक नवा पाहुणा आला. व्हेलेंटाईन डेच्याच दिवशी आलेला हा नवा पाहुणा सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच्या गोंडस लीला आणि त्याची प्रत्येक छबी टिपण्यासाठी पर्यटक ताडोबात गर्दी करत आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 17, 2013, 08:47 PM IST

आशिष अंबाडे, www.24taas.com, चंद्रपूर
वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात आता एक नवा पाहुणा आला. व्हेलेंटाईन डेच्याच दिवशी आलेला हा नवा पाहुणा सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच्या गोंडस लीला आणि त्याची प्रत्येक छबी टिपण्यासाठी पर्यटक ताडोबात गर्दी करत आहेत.
चौदा फेब्रुवारीला ताडोबातील सुशीला या हत्तीला गणराज या हत्तीपासून झालेला इटुकला गजराज सध्या पर्यटकांना आकर्षित करत आहे. हत्तीणीसोबत लडिवाळ खेळणारा हा नवा पाहुणा येत्या काळात ताडोबातील आकर्षण ठरणार आहे. आई-बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांना पशुवैद्यकीय अधिकऱ्यांच्या देखरेखीत ठेवण्यात आलंय.

सहा वर्षांपूर्वी वनसंरक्षण कामं तसेच पर्यटनासाठी गडचिरोलीच्या आलापल्ली येथून तीन हत्ती ताडोबात आणलं होतं. त्यापैकी एका हत्तीणीने यापूर्वीही ताडोबात आपल्या पिल्लाला जन्म दिला होता. आता पुन्हा एकदा हत्तीणीची वीण यशस्वी झाल्याने हा परिसर वन्यजीव वाढीसाठी सर्वोत्तम ठिकाण असल्याचं सिद्ध केलंय. इतकंच नाही तर भविष्यात ताडोबातही पर्यटकांना हत्तीवर बसून जंगल सफारी करणं शक्य होणार आहे...