www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुरुंग सुरक्षेचे सर्व कायदे धाब्यावर बसवत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांजवळ मोबाइल फोन सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीही नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एका कर्मचाऱ्याला तुरुंगाच्या आत मोबाईल फोन आणि मादक पदार्थ घेऊन आत जाताना रंगेहाथ अटक झाली होती. पण, अजुनही या परिस्थितीत काहीच फरक पडला नसल्याचं या घटनेनं सिद्ध झालंय.
नागपूरच्या या मध्यवर्ती कारागृहात मुंबईतल्या साखळी बॉम्ब स्फोटातले आरोपी, तसंच कट्टर नक्षलवादीही बंदिस्त आहेत. त्यामुळे राज्यातल्या संवेदनशील कारागृहात याचा समावेश होतो. मात्र या जेलच्या सुरक्षेतला ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या जेलमधल्या कैद्याकडे मोबाईल फोनसारखी संपर्क साधनं सापडली आहेत.
तुरुंग प्रशासनात बोकाळलेला भ्रष्टाचार अशा घटनांना जबाबदार असल्याचा दावा माजी पोलीस अधिकाऱ्यांनी केलाय. मध्य प्रदेशातल्या तुरुंगातून इंडियन मुजाहिद्दीनचे सात कट्टर दहशतवादी पळून गेले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती नागपुरातही होऊ शकते अशी भीती माजी पोलीस महासंचालक प्रबीर कुमार चक्रवर्ती यांनी व्यक्त केलीय.
तुरुंगात राजेशाही थाटात वावरणाऱ्या या कैद्यांना वरदहस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं कधी समोर येणार? हा सवाल आता विचारला जातोय. या प्रकरणात उशीर होण्याआधीच या प्रश्वाची उत्तरं शोधण्याची गरज आता निर्माण झालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.