अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण..बलात्कारानंतर गाडीतून फेकून दिले, पुढे...

धक्कादायक. चंद्रपुरात अपहण करून आपल्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आपल्याला चालत्या गाडीतून फेकून देण्यात आले, अशी तक्रार पिडीत शाळकरी मुलीने पोलिसांना दिली. तपासाची चक्रे फिरलीत. मात्र, पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी डोक्याला हात मारले. याबाबत तसा पोलिसांनी खुलासा केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 21, 2013, 06:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,चंद्रपूर
धक्कादायक. चंद्रपुरात अपहण करून आपल्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आपल्याला चालत्या गाडीतून फेकून देण्यात आले, अशी तक्रार पिडीत शाळकरी मुलीने पोलिसांना दिली. तपासाची चक्रे फिरलीत. मात्र, पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी डोक्याला हात मारले. याबाबत तसा पोलिसांनी खुलासा केलाय.
ही शाळकरी मुलगी अल्पवयीन आहे. तिने टिव्हीवरील गुन्हेविषय मालिका पाहून स्वत:च नाट्य रचले आणि पोलिसांना माहिती दिली आणि तक्रारही नोंदविली. आपले अपहरण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बलात्कार केला गेला. बलात्कार केल्यानंतर मला चालत्या गाडीतून फेकून दिल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलेय.
या प्रकारानंतर चंद्रपूर हादरून गेले. एका अल्पवयीन विद्यार्थीनीला शाळेसमोरून एका वाहनातून अपहरण करण्यात आले. तिचा चालत्या गाडीत विनयभंग करून चंद्रपूर-नागपूर महामार्गावर टाकून दिल्याची घटना पोलिसांना सांगण्यात आली. त्यानंतर दिल्लीतील निर्भयाप्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची पाल पोलिसांच्या मनात चुकचुली. पोलीसदल हादरवून गेले. मात्र, तपासाची चक्रे फिरताच या खळबळजनक घटनेचे धक्कादायक सत्य पुढे आले. अशी घटना घडलीच नसताना टिव्हीवरील गुन्हे आधारित मालिका पाहून मुलीने हा बनाव रचल्याचे उघड झालें आहे.
नववीतील विद्यार्थिनीला शाळेसमोर पार्क केलेल्या एका कारमध्ये बळजबरीने कोंबण्यात आले. कारमध्ये असलेल्या ५ युवकांनी चालत्या गाडीत तिचा विनयभंग करत तिला चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील भद्रावती शहराजवळ एका मंदिरापाशी गाडीतून खाली फेकले. या प्रकरणाची तक्रार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.
मुलीची, तिच्या माता-पित्याची, मित्र-मैत्रिणींची सखोल चौकशी करण्यात आली. यासाठी शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे रिकॉर्डींग तपासण्यात आले. पोलिसांनी केलेल्या पिडीतेची वैद्यकीय तपासणी केली. यात बलात्कार झाला नसल्याचे उघड झाले होते. या क्षणापासून पोलिसांना या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय बळावला होता. पोलिसांनी महिला पोलिस उप-अधीक्षकाच्या नेतृत्वात पुन्हा एकदा पिडीत मुलीचे बयान घेतले यात धक्कादायक सत्य पुढे आले. टीव्हीवरील विविध गुन्हे आधारित मालिकांच्या कथा बघून आपण हा बनाव रचल्याचे पिडीत मुलीने तपासादरम्यान कबुल केले. आई-वडिलांचे आपल्यावर किती प्रेम आहे हे बघण्यासाठी ही खोटी कहाणी रचण्यात आली असल्याचेही तिने म्हटल्याचे पुढे येत आहे. मात्र हे सर्व करण्यामागे असलेला तिचा उद्देश काय हे मात्र अस्पष्ट आहे.
एखादी नववीतील मुलगी स्वतःवरच अपहरण-विनयभंग-सामूहिक बलात्कार असा बनाव करत जिल्ह्यातील अख्खी पोलिस यंत्रणा तपास कामी लावते हे केवळ धक्कादायक नव्हे तर अंतर्मुख करणारे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मुलांना टिव्हीवरील गुन्हे आधारित मालिका सावधान करण्यासाठी आहेत की गुन्हे घडवायला, असाही प्रश्न उपस्थित कऱण्यात आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.