येडा अन्ना, कतरीना आणि अमिताभ... एकत्र!

शिवाजी, कतरिना, सर्किट, येडा अन्ना, गब्बर, अमिताभ, माया... ही नावं आहेत ताडोबा अंधारी  प्रकल्पातील वाघ-वाघिणींची...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 3, 2014, 06:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
शिवाजी, कतरिना, सर्किट, येडा अन्ना, गब्बर, अमिताभ, माया... ही नावं आहेत ताडोबा अंधारी  प्रकल्पातील वाघ-वाघिणींची... या मंडळींना अशी सिनेमातील नावं का दिली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर, या नावांमागे आहे एक गमतीदार रहस्य...
नावात काय आहे..? तर नावात गंमत आहे... ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र दर्शनासाठी गेल्यानंतर ही गंमत तुम्हाला अनुभवता येईल. इथल्या गाईडसच्या तोंडून वाघांची अजब-गजब नावं ऐकली की नवल वाटतं... येडा अन्ना, छोटी तारा, माया, पिंटू, पांडोबा... अशी आहेत या वाघ-वाघिणींची नावं. एखादा वाघाला तेच नाव का पडलं, त्यामागची कथाही गाईड सुरसपणे सांगतात. मग पहिल्याच भेटीत कथेत वर्णन केल्यापैकी एखाद्या वाघ-वाघिणीचे दर्शन झाले की पर्यटकांच्या आनंद अवर्णनीय असतो.
या वाघोबांचे किस्से ऐकले आणि लकबी पाहिल्या की तुम्हालाही ही नावं समर्पकच वाटतील. खरंतर गाईड्स, हौशी पर्यटक आणि वन्यजीव छायाचित्रकार यांनी वाघांची ऐट, रुबाब, शारीरिक खुणा, लकबी, सवयी यांच्या निरीक्षणावरून त्यांना ही नावं दिलीत, असं स्थानिक गाईड चंद्रकांत वाघ यांनी म्हटलंय.
या व्याघ्र परिवारात दोन बछडे आहेत. यातील एक बछडा चांगलाच धीट आहे. ताडोबातील पर्यटकांना सतत दिसणारा एक बछडा पर्यटकांच्या वाहनांशी चांगलाच फॅमेलिअर झालाय. त्याच्या या सवयीवरून त्याला सर्किट असं नाव देण्यात आलंय. याशिवाय डौलदार चाल आणि ऐटदार रुबाब असणारा दुसऱ्या बछड्याला शिवाजी... तर पर्यटकांचा सर्वाधिक आवडता आहे अमिताभ... शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली कतरीना अर्थात शेपूट तुटलेली बांडीही इथं दिसते.
 
आहे की नाही गंमत... आता तुम्ही जेव्हा ताडोबात याल, तेव्हा वाघांच्या या नाम महात्म्याची माहिती अवश्य घ्या... कोण जाणे त्यांचं वर्णन ऐकता-ऐकता एखादा वाघोबा तुम्हाला दर्शन देईल... तेव्हा तुम्हीही म्हणाल, `अरे भीडू, ये तो अपना सर्कीट है...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.