www.24taas.com, झी मीडिया, धुळे
धुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत ७० पैकी ३४ जागी विजय मिळवलाय. काही जागांवर राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार विजयी झाल्यानं राष्ट्रवादीच्या सत्तेचा मार्ग मोकळा झालाय. विद्यमान आमदार अनिल गोटे यांच्या महिला राजला मतदारांनी नाकारलंय. तर युतीचं संख्याबळही कमी झालंय.
धुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वांचेच अंदाज चुकवलेत. राष्ट्रवादीला बहुमतासाठी अवघ्या २ जागा कमी पडल्यात. मात्र दोन पुरस्कृत उमेदवार आणि एका अपक्ष उमेदवारानं राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं पक्षाच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. राष्ट्रवादी प्रमाणं काँग्रेसनंही आपलं संख्याबळ वाढवलंय. तर महिला राजचा नारा देत मैदानात उतरलेल्या लोकसंग्राम पक्षाचं पानिपत झालंय. शिवसेनेलाही अंतर्गत बंडाळीचा फटका बसलाय.
धुळे महापालिकेत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला असून राष्ट्रवादीनं ३४ जागी विजय मिळवलाय. काँग्रेसलाही ४ जागांचा फायदा झाला असून पक्षानं ७ जागी विजय मिळवलाय. शिवसेनेनं ११ तर भाजपनं ३ जागा जिंकल्यात. समाजवादी पक्षानंही ३ जागा जिंकत आपलं अस्तित्व दाखवून दिलंय. तर ११ जागांवर अन्य उमेदवार विजयी झालेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी या निवडणुकीकडं विशेष लक्ष दिलं होतं. त्याचाच फायदा पक्षाला मिळालाय. आता धुळेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र होण्याचं आव्हान राष्ट्रवादीसमोर असणार आहे.
अंतीम निकाल
राष्ट्रवादी - ३४
शिवसेना – ११
काँग्रेस – ७
भाजप – ३
बसपा - १
सपा - ३
लोकसंग्राम -१
इतर - १०
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.