www.24taas.com, झी मीडिया, नगर
अहमदनगर महापालिका निवडणुकीत कोणत्याच आघाडीला बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू अवस्था निर्माण झालीय.युती आणि आघाडीमध्ये सत्तास्थापनेसाठी जोरदार चुरस असून सत्तेच्या चाव्या मनसे आणि अपक्षांच्या हाती असणार आहेत.
अहमदनगर महापालिका निवडणुकीत अंतर्गत मतभेदाचा फटका युतीला बसलाय. अहमदनगरमध्य़े राष्ट्रवादीनं १८ तर काँग्रेसनं ११ जागा जिंकल्यात. शिवसेनंनं १७ तर भाजपनं ९ जागा जिंकत आघाडीला जोरदार टक्कर दिलीय. मनसेनं ५ जागा जिंकल्या असून ८ जागांवर अपक्ष विजयी झालेत.
या निवडणुकीत भाजपनं स्वतंत्रपणे प्रचार केला. तसंच चांगले उमेदवार न दिल्यानं युतीला कमी जागा मिळाल्या. असा आरोप शिवसेना आमदार अनिल राठोड यांनी केलाय.
युतीतल्या मतभेदांना सुरुवात झाली असताना आघाडीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शहराला विकासाची गरज आहे, त्यामुळंच सत्ता परिवर्तनासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अरुणकाका जगताप यांनी केलाय.
अहमदनगरमध्ये युती आणि आघाडीच्या लढाईत आघाडीनं बाजी मारलीय. मात्र युतीनं पुरस्कृत केलेले चार अपक्ष उमेदवार विजयी झालेत. त्यामुळं अजुनही युतीला सत्ता स्थापनेची संधी आहे. चुरशीच्या या लढतीत आता मनसे आणि अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या असणार आहेत.
अंतीम निकाल
आघाडी – २९
युती – २६
मनसे – ५
अपक्ष – ८
जागांवर विजय मिळवला आहे. एकूण ६८ जागांसाठी रविवारी मतदान झाले. त्यात बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता होती. मात्र कोणती आघाडी किंवा पक्ष एकतर्फी बहूमत मिळवू शकले नाही. त्यामुळे या ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
आता सत्ता स्थापनेसाठी अपक्ष किंवा मनसेची मदत घ्यावी लागणार आहे. आघाडीने अपक्षांशी हात मिळवणी केली तर नगरच्या महापालिकेवर आघाडीचा झेंडा फडकणार आहे.... तसेच मनसे आणि एका अपक्षाला साथीला घेतल्यासही आघाडीचं बेरजेचं गणित जुळून येणार आहे. युतीसाठी मात्र, तारेवरची कसरत करावी लागणार आहे. युतीने अपक्षांना जरी साथीला घेतलं तरी त्यांना मनसेकडे हात पसरावे लागणार आहे.
पक्ष निहाय विजयी जागा....
राष्ट्रवादी - १८
शिवसेना – १७
काँग्रेस -११
भाजप –९
मनसे – ५
अपक्ष - ८
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.