घोटभर पाण्यासाठी सख्या भावालाच फेकले विहिरीत

विहिरीतून पाणी घेण्याच्या वादावरून सख्या भावाला विहिरीत फेकून हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीये. पाराजी पुंड यानं आपल्या दोन मुलांच्या आणि सुनेच्या मदतीने सख्या भावाचा खून केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 17, 2013, 01:45 PM IST

www.24taas.com,अहमदनगर
विहिरीतून पाणी घेण्याच्या वादावरून सख्या भावाला विहिरीत फेकून हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीये. पाराजी पुंड यानं आपल्या दोन मुलांच्या आणि सुनेच्या मदतीने सख्या भावाचा खून केलाय.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात नांदगाव येथे दत्तात्रय हरिभाऊ पुंड आणि पाराजी हरिभाऊ पुंड या दोन भावांची सामाईक विहीर होती. विहिरीत दुष्काळामुळे पाणी अतिशय कमी होतं.
दोन्ही भावांमध्ये पाणी घेण्यावरून सतत वाद होत होते. नेहमीप्रमाणे सकाळी शेतीसाठी पाणी घ्यायला दत्तात्रय विहिरीवर गेले असता भाऊ पाराजी बरोबर त्यांची बाचाबाची झाली. संतापलेल्या पाराजीनं आपली दोन मुले अशोक, विक्रम आणि सून गयाबाई यांच्या मदतीने दत्तात्रय यांना विहिरीत फेकून दिलं. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

सख्या भावाचा खून करुन पाराजी पुंड फरार झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालाय. अशोक पुंड, विक्रम पुंड, गयाबाई पुंड या तिघांना अटक झालीये. जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीये.
तीव्र पाणी टंचाई असल्यानं घोटभर पाण्यासाठीही माणसं भांडत आहे. दुष्काळ जीवावर उठलाय असंच या घटनेवरुन म्हणता येईल.