पाण्याविना बिबट्यानं अन् हरणानं गमावले प्राण!

कडक उन्हाळा आणि दुष्काळाची वाढती भीषण दाहकता यामुळे पाण्याकरता वणवण भटकणाऱ्या गावकऱ्यांचं दृश्य काही नवीन नाही. मात्र, अशीच काहीशी परिस्थिती आता वन्य प्राण्यांचीही होताना दिसते य. पाण्याच्या शोधात एका बिबट्यानं तसंच एका हरणानं आपले प्राण गमावलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 20, 2013, 05:39 PM IST

www.24taas.com, नागपूर, ठाणे
कडक उन्हाळा आणि दुष्काळाची वाढती भीषण दाहकता यामुळे पाण्याकरता वणवण भटकणाऱ्या गावकऱ्यांचं दृश्य काही नवीन नाही. मात्र, अशीच काहीशी परिस्थिती आता वन्य प्राण्यांचीही होताना दिसते य. पाण्याच्या शोधात एका बिबट्यानं तसंच एका हरणानं आपले प्राण गमावलेत.
जंगलातील पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने प्राण्यांना पाण्याच्या शोधात भरकटावं लागतंय. तहानेने व्याकुळ झालेल्या आणि भटकी कुत्री मागे लागलेल्या एका हरणावर जीव गमावण्याची वेळ आली. नागपूरमधली ही घटना आहे. कुत्र्यांमुळे भेदरलेल्या आणि पाण्याच्या शोधात आलेल्या या हरणाचा अखेर उपचारापूर्वीच मृत्यू झालाय.

तर, उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्याची गरज असते आणि तेच पाणी पुरेशा प्रमाणात त्यांना मिळत नाही. पाण्याच्या शोधात प्राणी बाहेर पडतात अन् हाच पाण्याचा शोध त्यांच्या जीवावर उठतो. अशीच घटना तर ठाण्यातल्या लोकमान्य पाडा या भागात घडलीय. या ठिकाणी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. एका विहीरीमध्ये सहा महिन्यांचा बछडा सापडला. सकाळी या भागात मुलं क्रिकेट खेळत होती. त्यावेळेला त्यांना हा बिबट्या विहीरीत पडलेला दिसला. हा बछडा रात्री पाणी पिण्यासाठी आला असावा आणि त्यावेळी विहीरीत पडला असावा असा अंदाज आहे.